पंढरपूरचे सौरऊर्जा संशोधक अतुल सागडे यांचे संशोधन

स्वच्छ ऊर्जा म्हणून बघितल्या जाणाऱ्या सौरचुली आता अपुऱ्या सूर्यप्रकाशात किंवा कमीजास्त होणाऱ्या सूर्यप्रकाशातही वापरणे शक्य झाले आहे. पंढरपूरचे सौरऊर्जा संशोधक अतुल सागडे यांनी केलेल्या संशोधनामुळे सौरचुलीची ऊर्जासक्षमताही अचूकरीत्या मोजता येणार असून, त्यासाठी त्यांनी ‘ओपन सन कूलिंग टेस्ट’ ही नावीन्यपूर्ण औष्णिक पद्धत विकसित केली आहे. या संशोधनामुळे अशा प्रकारच्या वातावरणात कार्यरत राहू शकणाऱ्या नवीन सौरचुलींची संरचना करणे अधिक सोपे होऊ शकेल.

सौरऊर्जेच्या अनेक उपकरणांमध्ये सौरचूल हे महत्त्वाचे साधन आहे. दैनंदिन जीवनातही त्याचा प्रभावी वापर करता येतो. सौरचुलींवर शिजवलेल्या अन्नाचे औषधी फायदे आहेत. त्याशिवाय लाकूड, एलपीजी, केरोसीन अशा पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर टाळता येतो. त्यामुळे प्रा. एस. के. समदर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली सागडे यांनी त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह केलेल्या सौरचुलीवरील संशोधनात सौरचुलीचा वापर उच्च तापमानावर अन्न शिजण्याच्या प्रक्रियांमध्ये कसा करता येतो हे दाखवून दिले होते. तसेच त्याचे अचूक मापन आणि प्रमाणीकरणाची औष्णिक पद्धतही विकसित केली होती. सागडे यांनी याच संशोधनाला आता पुढील टप्प्यावर नेले आहे.

सौरचुलीचा वापर अपुऱ्या, अचानक कमी-जास्त होणाऱ्या सूर्यप्रकाशातही करता येऊ शकतो आणि त्याची ऊर्जासक्षमता अचूकतेने मोजता येऊ शकते, याचे सागडे यांनी संशोधन केले. त्यासाठी त्यांनी ओपन सन कूलिंग टेस्ट ही नवी औष्णिक पद्धत विकसित केली. या संशोधनावरील शोधनिबंध आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा सोसायटीच्या ‘सोलर एनर्जी’ या संशोधन नियतकालिकात प्रकाशित झाला. सौरऊर्जेबाबत संशोधन करण्यासाठी सागडे यांनी पंढरपूर येथे प्रयोगशाळा उभारली आहे. स्थानिक पातळीवर लोकांच्या गरजा लक्षात घेऊन सौरचुलींची निर्मिती करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरेल. त्यामुळे भविष्यात स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध  होण्यास मदत होईल. आधुनिक सौरचुलींची संरचना आणि त्यांची ऊर्जा सक्षमता यावर संशोधन करून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, असे सागडे यांनी सांगितले.

Story img Loader