पुणे महापालिकेच्या उरुळी देवाची येथील कचरा भूमीतील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पातून दैनंदिन ३०० ते ४०० युनिट वीजनिर्मिती सुरू झाली आहे. या वीजनिर्मितीचा वापर कचरा भूमीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी होणार आहे.
हेही वाचा- पुणे : तीन वर्षांत कसब्यातील मतदारांत १५ हजाराने घट; चिंचवडमध्ये ४८ हजार मतदार वाढले
उरुळी देवाची येथील कचरा भूमीसंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महापालिकेला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठवला होता. तसेच कचरा भूमी परिसरात पर्यावरणपूरक कामे करण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. लिचेड वाहून जाण्यासाठी गटारांची उभारणी, मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले असून कचरा भूमीमध्ये सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार कचरा भूमीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या छतावर सोलर निर्मिती पॅनल बसवून १०० किलो व्हॅट ऊर्जानिर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली होती. यातून निर्माण होणारी वीज कचरा भूमीच्या आवारातील पथदिवे, वजन काटा, तसेच पंप हाऊसचे विद्युत संच, सीसीटीव्ही यंत्रणा चालविण्यासाठी वापरली जात आहे. सध्या या सोलर पॅनलच्या माध्यमातून दिवसाला ३०० ते ४०० युनिट वीजनिर्मिती होत आहे, असे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.