पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्याची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या दोन्ही शहरात ३३ किलोमीटर मार्गावर ही कामे पूर्ण करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून तीन ग्रीडमधून वीजपुरवठा मेट्रोला करण्यात आला आहे. दरम्यान, मेट्रोच्या प्रत्येक स्थानकाच्या छतावर सौर वीजनिर्मिती संच बसविण्यात आले असून त्याद्वारे ११ मेगावॅट एवढी सौर वीजनिर्मिती शक्य आहे.
हेही वाचा >>>मानसिक आरोग्याबाबतची कलंक भावना दूर करण्यासाठी लॅन्सेटतर्फे मार्गदर्शक सूचना ; संवाद वाढवण्याची गरज अधोरेखित
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एकूण ३३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकांची कामे सध्या सुरू आहेत. या दोन्ही शहरातील काही अंतरात प्रवासी सेवाही महामेट्रोकडून सुरू करण्यात आली आहे. मेट्रोसाठी विनाव्यत्यय वीजपुरवठ्याची संरचनात्मक कामे करण्याचे आव्हान मेट्रोपुढे होते. त्यानुसार सलग सतरा ते अठरा तास मेट्रोसेवेसाठी निरंतर वीजपुरवठा होईल, अशी कामे पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.
हेही वाचा >>>पुणे : सदोष देयके मिळालेल्या ९७ हजार मिळकतींचे फेरसर्वेक्षण
पिंपरी-चिंचवड स्थानक येथील रिसिव्हिंग सबस्टेशनसाठी चिंचवड ग्रिड, रेंजहिल्स रिसिव्हिंग सब स्टेशनसाठी गणेशखिंड ग्रिड आणि वनाज रिसिव्हिंग सब स्टेशनासाठी पर्वती ग्रिडमधून वीजपुरवठा घेण्यात आला आहे. यासाठी पाच ते सहा किलोमीटर लांबीच्या १३३ केव्ही क्षमतेच्या विद्युत केबल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टाकण्यात आल्या आहेत. एका ग्रिडमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास दुसऱ्या ग्रिडमधून विद्युत पुरवठा घेऊन मेट्रोसेवा चालू ठेवणे शक्य होणार आहे. रेंजहिल्स येथील रिसिव्हिंग सब स्टेशन हे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांना एकाचवेळी विद्युत पुरवठा करू शकेल, अशा क्षमतेने बांधण्यात आले आहे.
हेही वाचा >>>पुणे : राज्यातील पाच पाेलीस अधिकाऱ्यांना आयपीएस दर्जा
मेट्रोने सौरऊर्जा निर्मिती करण्याचे नियोजित केले आहे. प्रत्येक स्थानकाच्या आणि इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा वीजनिर्मिती संच बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे ११ मेगावॅट एवढी सौर वीज निर्मिती करणे शक्य आहे. त्यामुळे विजेचीही बचत होणार आहे. जागतिक दर्जाच्या ट्रॅक्शन आणि पाॅवर यंत्रणांचा त्यासाठी वापर करण्यात आला आहे.