‘अ‍ॅटलास कॉप्को’चा चाकण येथील पथदर्शी प्रयोग

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऊर्जा बचतीची भविष्यातील गरज ध्यानात घेऊन ‘अ‍ॅटलास कॉप्को’ कंपनीने चाकण येथील कारखाना संपूर्णपणे सौरऊर्जेवर नेला आहे. या प्रकल्पाला यश लाभल्याने व्यवसायामुळे होणारा पर्यावरणीय परिणाम सातत्याने कमी करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे. उन्हाळा सुरू झाला असून या कालखंडात विजेची वाढती मागणी लक्षात घेता कारखाना संपूर्णपणे सौरऊर्जेवर नेण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये कंपनीच्या यशाची गुढी उभारली गेली आहे.

‘ऊर्जेची बचत हीच ऊर्जेची निर्मिती’, असे बोधवाक्य असलेले फलक काही वर्षांपूर्वी झळकताना दिसत होते. ऊर्जेविषयी साक्षरता वाढावी हा उद्देश असताना अ‍ॅटलास कॉप्को या शाश्वत उत्पादकता सोल्युशन्स पुरविणाऱ्या आघाडीच्या कंपनीने हे कृतिशील पाऊल उचलले आहे. कंपनीच्या चाकण येथील कारखान्याला सौर पॅनेलद्वारे वीजपुरवठा करण्यास सुरुवात झाली असून ‘महावितरण’कडून घेतल्या जाणाऱ्या विजेची बचत शक्य झाली आहे.

चाकण येथील अ‍ॅटलास कॉप्को प्रॉडक्ट कंपनी ही लीन उत्पादनातील आघाडीची कंपनी असून ती सातत्याने पर्यावरणपूरक कल्पनांचा स्वीकार करीत असते. कंपनीने ऊर्जाक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कंपनीने हाती घेतलेल्या प्रकल्पात कारखान्याच्या छतावर सोलर सेल्स बसविण्यात आल्यामुळे हा प्रकल्प आता विजेच्या संदर्भात स्वायत्त आहे. या प्रकल्पास ८० टक्के अपारंपरिक ऊर्जा पुरवली जाते. त्यामुळे हा कारखाना आता दरवर्षी ६०० टन इतके कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन रोखणार आहे. संपूर्ण कारखाना सौरऊर्जेवर नेण्यात आला असल्यामुळे पर्यावरण आणि अर्थकारण या दोन्ही गोष्टींमध्ये फायदा मिळणार आहे, असे अ‍ॅटलास कॉप्कोच्या कॉम्प्रेसर टेक्निक बिझनेसचे अध्यक्ष व्हॅग्नर रेगो यांनी सांगितले.

अ‍ॅटलास कॉप्को कंपनीच्या या अद्ययावत प्रकल्पाचे पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ मध्ये उद्घाटन झाले. त्यामध्ये भारतीय आणि जागतिक बाजारासाठी औद्योगिक आणि पोर्टेबल कॉम्प्रेसर्सची निर्मिती केली जाते. वातानुकूलन यंत्रणेची म्हणजेच एअर कंडिशनिंगची गरज भासू नये म्हणून रूफ इन्शुलेशनसह सुरुवातीपासूनच या प्रकल्पात ऊर्जा क्षमतेवर भर देण्यात आला आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी केलेल्या पर्यावरणपूरक डिझाईनमुळे वर्षांतून आठ महिने पाण्याची उपलब्धता होते. कारखान्याची ही हरित इमारत ‘लीड’च्या (लीडरशिर इन एन्व्हॉयर्नमेंटल एनर्जी अँड डिझाईन) सर्वोत्तम पद्धतींना अनुसरून आयजीबीसी (इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल) गोल्ड प्रमाणित आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solar power plant setup in pune