पुणे: राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे (एनटीए) अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (एआयएसएसईई) ८ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४अंतर्गत सहावी आणि नववीसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. देशातील ३३ सैनिकी शाळांसाठी ही परीक्षा घेतली जाईल. सहावीसाठी १० ते १२ वर्षे, नववीसाठी १३ ते १५ या वयोगटाची मर्यादा आहे. मुलींना केवळ सहावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल.
सैनिकी शाळा या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. या शाळांद्वारे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), इंडियन नेव्हल अॅकॅडमी (आयएनए), इतर लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. अधिकाधिक विद्यार्थ्यांना सैनिकी शाळांद्वारे शिक्षण मिळण्यासाठी संरक्षण मंत्रालयातर्फे १८ नवीन सैनिकी शाळांना मान्यता देण्यात आली आहे. देशातील १८० शहरांमध्ये ही प्रवेश परीक्षा घेतली जाईल. अधिक माहिती https://aissee.nta.nic.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.