समाजातील शेवटच्या घटकाचा विकास, हा विचार तळागाळात पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री रेणूका सिंह यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचा >>> कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधारा

भाजपच्या ‘लोकसभा प्रवास योजने’अंतर्गत रेणूका सिंह यांनी शिरूर लोकसभेतील पदाधिकाऱ्यांशी भोसरीत संवाद साधला. या बैठकीस आमदार महेश लांडगे, प्रभारी माधुरी मिसाळ, संयोजक धमेंद्र खांडरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेत रेणूका सिंह यांनी शिरूर लोकसभेच्या विविध प्रश्नांचा उहापोह केला.पत्रकारांशी बोलताना रेणूका सिंह म्हणाल्या, शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. ते प्रश्न समजून घेत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. भाजपचे संघटन मजबूत करण्याचे ध्येय ठेवून पक्षाची वाटचाल सुरू आहे.