पुणे : राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या आमदार रवी राणा यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी कडक शब्दात समाचार घेतला. महायुतीतील काही ‘ महाभाग ‘ पैसे परत घेण्याचे वक्तव्य करत आहेत, मी तुम्हाला शब्द देतो की, कुणी मायचा लाल तुमच्या बँक खात्यात गेलेला पैसा परत घेऊ शकत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी आमदार रवी राणा यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
महाराष्ट्रातील आया बहिणींसाठी महायुती सरकारने लाडकी बहीण ही योजना आणली आहे. राज्यातील महिला वर्गांसाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणारी आहे. त्यामुळे या योजनेचे पैसे कोणीही परत घेऊ शकत नाही. महायुती सरकारने ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे या योजनेवर चुकीचं वक्तव्य करणाऱ्यांच्या हातात काय मंदिरातील घंटा आहे का? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी रवी राणा यांना चांगलेच फटकारले. महायुतीतील कोणीही अशा पद्धतीने चुकीचे वक्तव्य करू नये, चुकीला माफी नाही, असेही पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सुनावले.
हेही वाचा – पार्थ अजित पवारांचा चिंचवड विधानसभेवर दावा; म्हणाले, नाना काटे यांना….
महायुतीचे भाग असलेले आमदार रवी राणा यांनी या योजनेबद्दल जाहीर वक्तव्य केले होते. ‘आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे देतोय, तुम्ही आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिले नाही तर हे पैसे परत घेऊ’ असे राणा म्हणाले होते. त्यावर विरोधी पक्षाच्या वतीने जोरदार टीका केली जात होती. हडपसर येथील जन सन्मान यात्रेत राणा यांनी केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच महायुतीतील पदाधिकाऱ्यांचे कडक शब्दात कान टोचत कोणतेही वक्तव्य करताना जपून करा अन्यथा गय केली जाणार नाही, असे सुनावले.
आत्तापर्यंत लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत ५० लाख महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम पोहोचली आहे. पुढील दोन दिवसात १७ ऑगस्टपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यावर या योजनेची रक्कम पोहोचवली जाईल. ती रक्कम ऑनलाईन पद्धतीने पाठवली जात असल्यामुळे दोन दिवसांचा विलंब होत आहे. एका बहिणीला रक्कम मिळाली की लगेच दुसऱ्या बहिणीला मिळेलच असे नाही त्यामुळे घाबरून जाऊ नका प्रत्येकीला तिच्या बँक खात्यावर या योजनेचे अनुदान मिळणार आहे. थोडी कळ काढा, असे सांगण्यास देखील उपमुख्यमंत्री अजित पवार विसरले नाहीत.
हेही वाचा – पुणे : वडगावशेरी भागातील नागरिकांनी अजित पवारांसमोर वाचला समस्यांचा पाढा
राज्यातील ५२ लाख कुटुंबांना ३ सिलेंडर फ्री दिले जाणार आहेत. महिला, शेतकरी, विद्यार्थी, त्यांच्यासाठी आम्ही योजना सुरू केल्या आहेत. या योजनेसाठी जे पात्र आहे त्या सर्वांना राज्य सरकारकडून पैसे मिळणारच आहे. जे पात्र असूनही पैसे मिळणार नाही, त्यांनी आम्हाला सांगावं असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले.
महायुतीचे अधिकाधिक आमदार निवडून आणा
अल्पसंख्याक लोकांसाठी आम्ही ‘ मार्टी ‘ काढत आहोत आपण कधीच भेदभाव करत नाही आपण सगळ्यांसाठी काम करतो. लोकसभेत जे झालं ते सोडून द्या. आता काम करायचे आहे. विधानसभेत आपले असतील सेनेचे असतील किंवा भाजपचे असतील आमदार आपल्याला निवडून आणायचे आहेत, असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.