लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यापूर्वी आरोपींनी गोळीबाराचा सराव केला होता. त्या ठिकाणांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. खून प्रकरणात आणखी आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात सोमवारी दिली.

याप्रकरणातील आरोपी सागर राजेंद्र पवार (वय ३२, रा. नऱ्हे), साहिल उर्फ टक्या निलेश दळवी (वय १९, रा. धनकवडी), प्रसाद पांडुरंग बेल्हेकर (वय ३३, रा. नाना पेठ) यांच्या पोलीस कोठडीत पाच ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. बारा आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दिले.

आणखी वाचा-पुणे मेट्रोचा अजब कारभार! मेट्रोच्या तिकिटापेक्षा वाहनतळ शुल्कच जास्त

खून प्रकरणातील सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी सागर पवार, साहिल दळवी आणि प्रसाद बेल्हेकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड यांच्यासह पवार, दळवी, बेल्हेकर यांची चौकशी करायची आहे. आरोपींकडून दहा कोयते जप्त करण्यात आले आहेत. खुन करण्यासाठी वापरलेले तीन कोयते जप्त करायचे आहेत. आरोपींना पिस्तूल खरेदीसाठी कोणी आर्थिक मदत केली, त्यांनी गोळीबाराचा सराव कोठे केला, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे, असे त्यांनी युक्तिवादात नमूद केले.

आणखी वाचा-ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप

सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तीन आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ केली. उर्वरित आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some more people involved in vanraj andekar murder case shooting practice by accused before murder pune print news rbk 25 mrj