राष्ट्रवादीशी संलग्न आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेकापच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली असताना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचाच प्रचार करण्याचे फर्मान सोडले असताना पिंपरीतील आजी-माजी नगरसेवकांनी जगताप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय एका बैठकीत घेतला. पिंपरीगावातील बांधकाम व्यावसायिक संदीप वाघेरे यांच्या पुढाकाराने ‘समृध्दी’ हॉटेलमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक हरेश आसवानी यांच्या अध्यक्षतेखाली व शंकर जगतापांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस गुरूबक्ष पेहलानी, प्रभाकर वाघेरे, संतोष कुदळे, श्रीरंग शिंदे, कैलास नाणेकर, प्रवीण कुदळे, राजेश वाघेरे, संदीप वाघेरे, आनंदा कुदळे, कैलास कुदळे, दत्ता मासूळकर, चंद्रकांत भोळे उपस्थित होते. या वेळी जगताप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, याच गावातील प्रमुख नेते व राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत स्पर्धेत असलेल्या संजोग वाघेरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही.

Story img Loader