लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा सोमवारी (१३ नोव्हेंबर) भरणार असून, खंडोबा गडातून देवाचा पालखी सोहळा सकाळी सात वाजता प्रस्थान ठेवणार आहे. दुपारी साडेबारा वाजता पवित्र कऱ्हा नदीवर श्री खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्तींना धार्मिक वातावरणात स्नान घालण्यात येणार आहे.

सोमवती अमावास्येच्या नियोजनासाठी होळकरांच्या छत्री मंदिर परिसरात खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ मंडळाची बैठक झाली. मुख्य इनामदार राजेंद्र पेशवे यांनी देवाची स्वारी सकाळी सात वाजता निघणार असल्याचे या वेळी जाहीर केले. रविवारी (१२ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजता अमावास्या सुरू होत असून, सोमवारी दुपारी अडीचपर्यंत अमावास्येचा कालावधी आहे. त्यामुळे जेजुरीत सोमवती यात्रेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत, देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे, ॲड. पांडुरंग थोरवे, अभिजित देवकाते, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, संतोष खोमणे, छबन कुदळे, अशोक खोमणे, कृष्णा कुदळे, सुधीर गोडसे, अजिंक्य देशमुख, व्यवस्थापक राजेंद्र जगताप बैठकीस उपस्थित होते.

आणखी वाचा-पुणे : लक्ष्मीपूजनानिमित्त आज मेट्रोची रात्र सेवा बंद, जाणून घ्या बदललेले वेळापत्रक

पालखी सोहळ्यातील भाविकांना चहा, पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली असून, पालखी मार्गाच्या पायऱ्यांवरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे, असे पोपटराव खोमणे यांनी सांगितले.

मागील सोमवती यात्रेत खंडोबा गडावर पालखी उतरताना अपघात होऊन सहा जण जखमी झाले होते. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. पालखीला खांदा देणाऱ्या खांदेकऱ्यांना वेगळा पोषाख देण्यात आला आहे. १३०० खांदेकऱ्यांना अशा पद्धतीचे टी-शर्ट दिले असून त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना खांदा देता येणार नाही असे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी सांगितले.

आणखी वाचा-मैत्रिणीला संदेश पाठविल्याने जाब विचारणाऱ्या तरुणावर वार; हडपसरमध्ये टोळक्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

भेसळयुक्त भंडारा विकणाऱ्यांवर कारवाई

सोमवती यात्रेच्या निमित्ताने जेजुरीत मोठ्या प्रमाणात भंडारा-खोबऱ्याची विक्री होते. भंडाऱ्याला मागणी भरपूर असल्याने काही बाहेरील व्यापारी यात्रेत भेसळयुक्त भंडारा विक्रीसाठी आणतात. हा भंडारा बनावट असून, त्यामध्ये विविध रसायनांचा वापर केला जातो. पालखी सोहळा सुरू झाल्यावर शेकडो पोती भंडाऱ्याची उधळण केली जाते. या भेसळयुक्त भंडाऱ्यावर बंदी घालण्याची मागणी ग्रामस्थ मंडळाने केली होती. या भंडाऱ्याचा भाविकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने कोणीही बनावट भंडारा विकू नये. विक्री केल्यास कडक कारवाई केली जाईल, अशा नोटिसा भंडार-खोबरे विक्रेत्यांना देण्यात आल्याची माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Somvati amavasya yatra in jejuri action will be taken against those selling adulterated bhandara pune print news vvk 10 mrj
Show comments