दारू पिऊन घरात यायचे नाही असं सासूने बजावल्याने जावयाने सासूच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदामती गायकवाड (60) असं मयत महिलेचे नाव आहे. तर दिगंबर ओव्हाळ (45) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चतु:श्रृंगी पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील संजय गांधी वसाहतीमधील लमाण तांडा जवळील वाघमारे वस्तीमध्ये दिगंबर ओव्हाळ राहत होता. सुदामती गायकवाड यांच्या मुलीसोबत त्याचं लग्न झालं होतं. हे त्याचं दुसरं लग्न होतं. दिगंबर ओव्हाळ मजुरीचे काम करायचा. त्याला दारूचे व्यसन होते आणि मांसाहारदेखील करत असे.

दारू पिऊन आणि मांसाहर करुन घरी आल्यानंतर त्याच्यात आणि सासूमध्ये अनेकदा वाद होत असे. बुधवारीदेखील दुपारच्या सुमारास दिगंबर ओव्हाळ दारू पिऊन घरात येत होता. यामुळे सुदामती यांनी त्याला घरात येऊ नको असं बजावलं. यावरुन वाद झाला आणि आरोपी दिगंबर याने सुदामती यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. सुदामती यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास करण्यात येत आहे.