पुणे : घटस्फोटाला आई जबाबदार असल्याच्या संशयातून मुलाने आईचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना खडकी भागात रविवारी घडली. आईचा खून करून पसार झालेल्या मुलाला शिर्डीतून पोलिसांनी ताब्यात घेतले. गुंफाबाई शंकर पवार (वय ५५, रा. श्रीरामपूर, जि.अहमदनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा ज्ञानेश्वर शंकर पवार (वय २९, रा. खडकी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईचा खून करून पसार झालेल्या ज्ञानेश्वरला पोलिसांनी शिर्डीतून ताब्यात घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> फलटण ते पंढरपूर रेल्वेला गती! लवकरच कामाला मंजुरी मिळण्याची चिन्हे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंफाबाई मूळच्या श्रीरामपूर परिसरातील मुठे वडगावातील रहिवासी आहेत. त्यांना दोन मुले आहेत. ज्ञानेश्वर खडकीत राहायला असून, तो दारूगोळा कारखान्यात कामाला आहे. दुसरा मुलगा देहूरोड परिसरात राहायला आहे. शनिवारी त्या मुलांना भेटण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. ज्ञानेश्वरचा घटस्फोट झाला आहे. तो एकटाच राहायला आहे. घटस्फोटाला आई जबाबदार असल्याचा संशय त्याला होता. शनिवारी मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या गुंफाबाईचा गळा ज्ञानेश्वरने चाकूने गळा चिरून खून केला. त्यानंतर तो घराला कुलुप लावून पसार झाला.

हेही वाचा >>> “साहेब आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका, तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला”, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे शरद पवार यांना साकडे

रविवारी सकाळी गुंफाबाईच्या नातेवाईकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने संशय आला. त्यामुळे नातेवाईकांनी देहूरोड परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वरच्या भावाशी संपर्क साधला. त्यानंतर ज्ञानेश्वरचा भाऊ रविवारी सकाळी खडकीतील घरी आला. तेव्हा घराबाहेर आईची चप्पल आढळून आली. घराला बाहेरून कुलुप होते. त्याने घराची खिडकी उघडून पाहिली. तेव्हा आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. या घटनेची त्याने पोलिसांनी कळविली. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुंफाबाई यांच्या अंगावर दागिने होते. मात्र, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर घरात नव्हता. त्याचा मोबाइल क्रमांक बंद असल्याने संशय बळावला. तांत्रिक तपासात तो पसार झाल्याचे लक्षात आले. तो शिर्डीतील पुणेतांबे परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खडकी पोलिसांचे पथक रवाना झाले. पुणतांबे परिसरातून त्याला सायंकाळी ताब्यात घेण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son slit his mother s throat and killed her over divorce issue pune print news rbk 25 zws