पुणे : ‘कांद्याची भाववाढ झाल्यानंतर सरकारला सत्तेतून खाली खेचणारे भारतीय मतदार स्वच्छ पाणी, शुद्ध हवा या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर का धरत नाहीत?,’ असा परखड सवाल लडाख येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी रविवारी उपस्थित केला. ‘सुरा भोसकणारा मोठा गुन्हेगार असतो. त्याप्रमाणे चंगळवादी जीवनशैलीमुळे स्वतःसह इतरांचेही आयुष्य अनैसर्गिकपणे घटविणाराही गुन्हेगार नाही का?,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
फ्रेंड्स ऑफ लडाख, फ्रेंड्स ऑफ नेचर पुणेतर्फे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेमध्ये सोनम वांगचुक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गुरुदास नूलकर, प्रा. प्रीती मस्तकर, आयोजक संस्थेचे संतोष ललवाणी, रुपेश सरोदे, प्रीती पुष्पा-प्रकाश या वेळी उपस्थित होते.
‘शहरातील नागरिक साधेपणाने जगल्यास डोंगराळ भागातील नागरिकांना ‘साधे’ जीवन तरी मिळेल,’ अशी टिप्पणी करून सोनम वांगचूक यांनी लडाखच्या आंदोलनाला पुण्यासह देशभरातून मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. ‘लडाखमधील प्रस्तावित वीजनिर्मिती प्रकल्पामुळे चारावाह्यांचा उदरनिर्वाह संपुष्टात येण्याची शक्यता असून, दिल्लीतील चंगळवादासाठी वीजपुरवठा केला जाणार असेल, तर आम्हाला नक्कीच वाईट वाटेल. लडाखच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात पर्यावरणाच्या रक्षणासाठी विविध गट लढाई लढत असून, त्यांच्या एकजुटीची गरज आहे. त्यासोबतच धर्म, न्यायव्यवस्था अद्ययावत करणे ही काळाची गरज आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.पुण्यातील मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाला विरोध दर्शवित वांगचुक यांनी नदी पुनरुज्जीवन चळवळीला पाठिंबा दर्शविला. संतोष ललवाणी यांनी प्रास्ताविक केले. डी. जे. फाउंडेशनचे दिलीप जैन यांनी मनोगत व्यक्त केले.