काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी, दिल्लीतील सत्काराच्या कार्यक्रमात ‘लेग स्पिनर’ सासऱ्यांचा संदर्भ देत केलेल्या गमतीदार टिपणीमुळे आपल्याला खूप आश्चर्य वाटले होते, असे सांगत आपण कितीही चांगले फलंदाज असलो तरी ‘विकेट’ पडणारच होती, अशी मिश्कील टिप्पणी ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी चिंचवड येथे केली. जनतेने खंबीर साथ व भरभरून प्रेम दिले असल्याने वेगळ्या सत्काराची गरज नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
नाटय़ परिषदेच्या वतीने पवार यांच्यासह पं. हृदयनाथ मंगेशकर, गंगाराम गवाणकर, अशोक पत्की, जयंत सावरकर, चंदू बोर्डे, कलाबाई काळे-नगरकर, ज्ञानेश्वर लांडगे यांचे सत्कार करण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, कार्यवाह दीपक करंजीकर, सहकार्यवाह भाऊसाहेब भोईर, खासदार अमर साबळे, महापौर शकुंतला धराडे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजेशकुमार सांकला आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, १९८४ मध्ये सर्वप्रथम लोकसभेत गेलो, त्याची पायाभरणी पिंपरी-चिंचवडमधून झाली. नागरिकांच्या भक्कम पाठबळामुळे अतिशय संघर्षांची निवडणूक जिंकू शकलो. संसदेत गोंधळ झाला की घरी आल्यानंतर ‘जैत रे जैत’ची गाणी ऐकतो, अशी टिप्पणी त्यांनी केली. कलाक्षेत्रातील महती सांगतानाच पवारांनी एका गाण्याच्या ओळी गुणगुणल्या. सत्काराची कल्पना नव्हती असे सांगत सर्वाच्या प्रेमाखातर त्याचा स्वीकार करत असल्याचे स्पष्ट केले. पुण्यात रुग्णालयासाठी पवारांनी नऊ एकर जागा एका दिवसात उपलब्ध करून दिल्याची आठवण मंगेशकरांनी करून दिली. पवारांनी मुख्यमंत्री असताना एकाच वेळी २२ कलावंतांना सदनिका मिळवून दिल्याचे सांगत पवारांचे नवे पुस्तक ‘राजकारणातील धर्मग्रंथ’ असल्याची टिप्पणी गवाणकरांनी केली. पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत, हे देशाचे दुर्दैव असल्याची खंत जोशी यांनी व्यक्त केली. ‘ट्वेन्टी-२०’ क्रिकेटचे पवार शिल्पकार असल्याचे बोर्डे यांनी सांगितले. प्रास्तविक भाऊसाहेब भोईरांनी केले. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा