पुणे : पुणे मेट्रोची रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावरील विस्तारित सेवा लवकरच सुरू होणार आहे. केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांनी या मार्गाची अंतिम तपासणी पूर्ण केली आहे. त्यांनी काही किरकोळ त्रुटी दूर करण्याचे निर्देश महामेट्रोला दिले असून, त्यानंतर या मेट्रो सेवेला अंतिम मंजुरी मिळणार आहे.
रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाची अंतिम तपासणी केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त गर्ग यांनी १९ जानेवारीपासून सुरू केली. त्यांनी ही तपासणी २१ जानेवारीपर्यंत पूर्ण केली. या तपासणीदरम्यान त्यांनी या मार्गातील काही त्रुटी उपस्थित केल्या. या त्रुटी दूर करून महामेट्रो त्याचा अहवाल आयुक्तांना पाठविणार आहे. त्यानंतर या मार्गाला अंतिम मंजुरी मिळणार आहे. आयुक्तांनी या मार्गाला हिरवा कंदील दिल्यानंतर महामेट्रोकडून मार्ग सुरू करण्याबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला जाईल. त्यानंतर राज्य सरकार मार्ग सुरू करण्याची तारीख निश्चित करेल, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.
आणखी वाचा-हवाई प्रवास नको रे बाबा! आठ तास ताटकळत ठेवल्यानंतर विमान रद्द झाले अन् प्रवासी संतापले…
रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाची मेट्रो तपासणी करण्यासाठी या महिन्यात सुरुवातीला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त कार्यालयाचे पथक पुण्यात आले होते. या पथकाने विस्तारित मार्गाची आठवडाभर तपासणी केली होती. या पथकाने काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटी मेट्रोकडून दूर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त गर्ग हे या मार्गाच्या तपासणीसाठी पुण्यात दाखल झाले होते.
केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाची अंतिम तपासणी पूर्ण झाली आहे. त्यांनी तपासणीदरम्यान काही किरकोळ त्रुटी काढल्या आहेत. या त्रुटी दूर करून त्याचा अहवाल चार-पाच दिवसांत आयुक्तांना पाठविण्यात येईल. त्यानंतर या मार्गाला अंतिम मंजुरी मिळेल. -अतुल गाडगीळ, संचालक (कार्य), महामेट्रो
रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग
अंतर – ५.५ किलोमीटर
स्थानके – बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी
सुरू कधी – फेब्रुवारीच्या सुरुवातीला शक्य