शहरातील प्रचंड रहदारी आणि या गर्दीतून वाट काढत वाहन पुढे नेण्यासाठी वाहनचालक वाजवीत असलेले हॉर्न हे दृश्य पुणेकर दररोज वेगवेगळ्या रस्त्यांवर अनुभवत आहेत. त्यामुळे वायुप्रदूषणाबरोबरच ध्वनिप्रदूषण ही एक समस्या निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून ‘ध्वनिप्रदूषणमुक्त शहर’ ही प्रबोधन मोहीम शुक्रवारपासून (२९ जानेवारी) तीन दिवस राबविण्यात येणार आहे.
‘हॉर्न वाजवू नका; ब्रेक किंवा लाईटचा वापर करा’ असे आवाहन या मोहिमेत केले जाणार आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशातून कम्युनिकेशन सपोर्ट फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था पुणे वाहतूक पोलीस आणि गिरिकंद हॉलिडेज यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवणार आहे. कर्वे रस्त्यावरील मृत्युंजयेश्वर मंदिर चौकातील सिग्नलपासून ते दशभुजा गणपती चौकापर्यंतचा सिग्नल येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजता या मोहिमेचा शुभारंभ होत आहे. या उपक्रमामध्ये कम्युनिकेशन सपोर्ट फाउंडेशन संस्थेचे स्वयंसेवक पहिल्या सिग्नलजवळ थांबलेले असतील. सिग्नलपाशी थांबलेल्या वाहनचालकाने त्या सिग्नलपासून पुढील सिग्नलपर्यंत हॉर्न न वाजविता जावे, असे आवाहन करून स्वयंसेवक त्या वाहनचालकाच्या परवानगीने ‘मी हॉर्न वाजविणार नाही’ असे स्टिकर वाहनावर लावतील. हा संदेश वाहनचालकाने शेवटच्या सिग्नलपर्यंत आणि पुढे कायमस्वरूपी पालन करावा, अशी अपेक्षा असल्याचे संस्थेचे प्रदीप दीक्षित यांनी सांगितले.
शनिवारी (३० जानेवारी) दुसऱ्या दिवशी नामदार गोखले चौक (हॉटेल गुडलक) सिग्नलपासून ते कृषी महाविद्यालय सिग्नलपर्यंतचा टप्पा, तर रविवारी (३१ जानेवारी) कोथरूड डेपोपासून ते गुजराथ कॉलनी सिग्नलपर्यंतचा टप्पा अशी मोहीम राबविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा