गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिवसरात्र कानांवर आदळणाऱ्या आवाजांबद्दल तक्रार करायची तरी कुठे, याबाबतचा नागरिकांचा उडणारा गोंधळ आता शमणार आहे. विशेष म्हणजे नुसत्या तक्रारी करून न थांबता त्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याबाबत पाठपुरावा करण्यासाठी वकिलांचा गट पुढे सरसावला आहे.
नागरिकांनी ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार कुठे करावी याची सविस्तर माहितीच या वकिलांनी प्रसिद्ध केली असून तक्रार करण्याच्या पद्धतीबद्दल मार्गदर्शन करण्याची तयारीही दाखवली आहे. इतकेच नव्हे तर नागरिकांनी केलेल्या तक्रारींचा आढावा घेऊन यंत्रणांच्या विरोधात उच्च न्यायालयात किंवा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात हे वकील दाद मागणार आहेत.
 सामाजिक कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अॅड. रमा सरोदे, अॅड. विकास शिंदे, अॅड. नेहा खाटी, अॅड. नम्रता बिरादार, अॅड. प्रताप विटणकर, अॅड. अलका बबलादी या वेळी उपस्थित होते. या वकिलांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयांना, तसेच पर्यावरण मंत्रालयाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. ध्वनिप्रदूषणाच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवून त्यावर कारवाई करण्यात या यंत्रणांना अपयश आले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. गणेशोत्सव, दुर्गा उत्सव अशा उत्सवांच्या निमित्ताने होणारे ध्वनिप्रदूषण तसेच अल्पसंख्याक समाजाच्या प्रार्थनास्थळांवर लावलेल्या ध्वनिक्षेपकांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबद्दलचा अहवाल तयार करून त्याबाबत १५ दिवसांत माहिती सादर करावी, असे या नोटिशीत म्हटले आहे.
डॉ. सरोदे म्हणाले, ‘‘आमचा कोणत्याही धर्माला किंवा उत्सवाला विरोध नसून उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीला विरोध आहे. सध्याची परिस्थिती पाहता रस्त्यांवर उत्सव साजरे करणे परवडण्याजोगे नाही. त्यामुळे उत्सवांच्या घरगुतीकरणासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत.’’
ध्वनिप्रदूषण- एकूणच आरोग्यासाठीच त्रासदायक
ध्वनिप्रदूषणाच्या आरोग्यावरील दुष्परिणामांबद्दल ‘असोसिएशन ऑफ ऑटोलॅरिंगोलॉजिस्ट्स ऑफ इंडिया’ या संस्थेच्या पुणे शाखेच्या सचिव डॉ. कविता चौधरी यांनी माहिती दिली. ‘अतिशय तीव्र, कर्कश आणि स्फोटक आवाज कानाच्या पडद्यांवर आदळल्यामुळे कानाचे पडदे फाटून कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो. कानाच्या शिरा बधिर झाल्यामुळेदेखील बहिरेपणा येऊ शकतो. काही जणांना चक्कर, उलटी, मळमळ असे त्रास होऊ शकतात. लहान बाळांना सर्दी झालेली असताना कर्कश आवाजात त्यांना नेल्यास कानदुखी होते,’ असे त्यांनी सांगितले.

नागरिक खालील दूरध्वनी क्रमांकावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तसेच १०० क्रमांकावर पोलिसांकडे ध्वनिप्रदूषणाबद्दलची तक्रार करू शकतात. तक्रार करण्याच्या पद्धतीबद्दल नागरिकांना शंका असल्यास ते अॅड. विकास शिंदे यांच्याशी ९६०४५३६०६० या क्रमांकावर संपर्क साधू शकतील. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दूरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे-
पुणे : ०२०-२५८११६२७
मुंबई : ०२२-२४०३३९९८
ठाणे : ०२२-२५८०२२७२
नवी मुंबई : ०२२-२७५७२७३९
रायगड : २७५७२६२०
कल्याण : ०२७१- २२०१६८५
नाशिक : ०२२५३- २३६५१५०
औरंगाबाद : ०२४०-२४७३४६२
नागपूर : ०७१२-२५३०३०८
अमरावती : ०७२१- २६६२९६५
कोल्हापूर : ०२३१- २६५२९५२
लेखी तक्रार केल्यानंतर काय कराल?
आपण प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केलेल्या तक्रारीची एक प्रत पुढील आढावा घेणे सोपे व्हावे यासाठी पुण्यातील सहयोग ट्रस्ट कार्यालय येथे पाठवावी. कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे- ‘सहयोग ट्रस्ट कार्यालय, फ्लॅट क्र. १, प्रथमेश सोसायटी, गल्ली क्र. ५, प्रभात रस्ता, दाबके नर्सिग होमजवळ, पुणे ०४’. संस्थेचा संपर्क क्रमांक : ०२०-२५४५७२२२

Story img Loader