गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील नागरिकांकडून ध्वनिप्रदूषणाच्या साधारण दीडशे तक्रारी आल्या असून त्याबाबत जनसुनवाई घेण्यात येणार असल्याचे अॅड. असीम सरोदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळातील ध्वनिप्रदूषण हा गेली अनेक वर्षे चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून दर वर्षी गणेशोत्सव काळातील ध्वनीची पातळी मोजून त्याबाबत अहवाल तयार केला जातो. मात्र, त्याबाबत प्रत्यक्षात कधी कार्यवाही होत नाही. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीही शहरातील अनेक भागांमध्ये आवाजाची पातळी ही ९० डेसिबलच्या जवळपास पोहोचल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानेच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. लोकांनी पुढे येऊन होणाऱ्या आवाजाच्या त्रासाविषयी तक्रार करावी, यासाठी अॅड. सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून चळवळ सुरू करण्यात आली होती.
शहरातील विविध भागांतील नागरिकांनी आवाजाचा त्रास होत असल्याच्या साधारण दीडशे तक्रारी केल्या आहेत. नागरिकांनी शंभर क्रमांकावर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे या तक्रारी नोंदवल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मंडळाकडून केला जाणारा ध्वनिक्षेपकाचा वापर, ढोल-ताशांचे सराव, मिरवणुका यांबाबत प्रामुख्याने तक्रारी आल्या आहेत. आलेल्या सर्व तक्रारींवर संबंधित मंडळ, पोलिस, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी काय कार्यवाही केली याबाबत जनसुनवाई घेण्यात येणार आहे. पुण्याबरोबरच राज्यातील इतरही जिल्ह्य़ांतून तक्रारी आल्या आहेत. या सगळ्या तक्रारी एकत्रित करून जनसुनवाईनंतर संबंधितांवर कारवाई न केल्यास महामंडळाविरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचे सरोदे यांच्याकडून सांगण्यात आले.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाला यापूर्वीच आम्ही कायदेशीर मार्गाने नोटिस दिली होती. उत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी आल्यास न्यायालयात जाणार असल्याचेही महामंडळाला सांगण्यात आले होते. तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता याबाबत न्यायालयात दाद मागणार आहोत, असे सरोदे यांनी सांगितले आहे.
 
आवाजाची पातळी शंभर डेसिबलहून अधिक
गणेशोत्सवाच्या काळात गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे उत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांतच लक्ष्मी रस्ता, मंडई या परिसरातील आवाजाची पातळी ही अगदी ११४ डेसिबलपर्यंत पोहोचली होती. अगदी रात्री दहानंतरही या भागांत ७० ते ७५ डेसिबलच्या दरम्यान आवाजाची पातळी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा