पुणे : देशभरात २८ जुलैअखेर ८३० लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. डाळी वगळता अन्य पिकांच्या पेरण्यांनी मागील वर्षाची सरासरी गाठली आहे. यंदा मोसमी पाऊस देशात उशिराने दाखल झाला आणि देशभरात सक्रिय होण्यास जुलै मध्य उजाडला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या संकटात सापडल्या होत्या. पण, जुलैच्या उत्तरार्धात देशात सर्वदूर पाऊस झाल्यामुळे खरिपाचा पेरा समाधानकारक झाला आहे.
देशात भात पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा २८ जुलैअखेर २३७.५८ लाख हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. यंदा जगभरात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षे साजरे केले जात आहे. देशातही तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे खरिपात १४५.७६ लाख हेक्टरवर तृणधान्यांची पेरणी झाली आहे. त्यात ज्वारी १०.५८, बाजरी ६०.६०, नाचणी २.४८ आणि अन्य तृणधान्यांचा पेरा २.७४ लाख हेक्टरवर झाला आहे. मक्याची लागवड ६९.३६ हेक्टरवर झाली आहे.
हेही वाचा >>> राज्यभरात पावसाची उघडीप; किनारपट्टी, घाटमाथ्यावर हलक्या सरी शक्य
तेलबियांच्या लागवडीने मोठी आघाडी घेतली आहे. देशभरात १७१.०२ लाख हेक्टरवर तेलबियांची लागवड झाली आहे. त्यात सोयाबीन आघाडीवर असून, ११९.९१ लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली आहे. त्या खालोखाल भुईमूग ३७.५८, तीळ १०.०७, कारळ ०.०९, एरंडी २.७७ आणि अन्य तेलबियांची लागवड ०.०८ लाख हेक्टरवर झाली आहे. कापूस लागवड ११६.७५ लाख हेक्टर, ऊस ५६ लाख हेक्टर आणि जूट, तागाची लागवड ६.३७ लाख हेक्टरवर झाली आहे.
डाळींची लागवड घटली
तूर वगळता अन्य कडधान्यांची लागवड पंधरा जुलैनंतर केल्यास फायदेशीर राहत नाही. पण, मोसमी पाऊस वेळेत न झाल्यामुळे कडधान्यांची लागवड वेळेत होऊ शकली नाही. त्याचा परिणाम म्हणून कडधान्यांचा पेरा घसरला आहे. मागील वर्षी २८ जुलैअखेर देशात सुमारे ११० लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यंदा ती ९६.८४ लाख हेक्टरवर स्थिरावली आहे. त्यात तूर ३१.५१, उडीद २५.८३, मूग २७.६४, कुळीथ ०.२१ आणि अन्य डाळींची लागवड ११.६५ लाख हेक्टरवर झाली आहे. आता तूर वगळता अन्य कडधान्यांच्या पेऱ्यात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही.
खरिपातील सर्वाधिक पीकनिहाय पेरणी क्षेत्र…. (लाख हेक्टर)
भात २३७.५८,
सोयाबीन ११९.९१,
कापूस ११६.७५,
मका ६९.३६,
बाजरी ६०,
ऊस ५६.