स.प. महाविद्यालयाची मान्यता काढून घेण्याच्या पुणे विभागीय शिक्षण मंडळाविरुद्ध स.प. महाविद्यालयाने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून, या याचिकेवर शुक्रवारी मंडळाची बाजू मांडण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाच्या सचिव पुष्पलता पवार यांनी गुरुवारी दिली.
खोटी गुणपत्रिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याबाबतच्या सूचनांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याबद्दल पुण्यातील स.प. महाविद्यालयाची मान्यताच मंडळाने काढून घेतली. या महाविद्यालयाच्या बारावी परीक्षांचे अर्ज स्वीकारणे मंडळाने बंद केले असून, ऑक्टोबर परीक्षांच्या गुणपत्रिकाही बोर्डाकडून महाविद्यालयाला देण्यात येणार नाहीत. या महाविद्यालयातून बारावीची परीक्षा देणाऱ्या एकूण चौदाशे विद्यार्थ्यांचे यामध्ये नुकसान होण्याचा धोका आहे. खोटी गुणपत्रिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध महाविद्यालयाने पोलिसांकडे तक्रार दाखल करावी अशी मंडळाने भूमिका घेतली आहे. ‘मंडळाच्या या निर्णयाविरुद्ध स.प. महाविद्यालयाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेची पहिली सुनावणी गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान झाली. यावर शुक्रवारी विभागीय मंडळाला बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. याबाबत आमच्याकडे पत्र आले आहे,’ असे पवार यांनी सांगितले.
उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्याबाबत विचारले असता शि. प्र. मंडळी संस्थेच्या वतीने बोलणारे संस्थेचे उपाध्यक्ष अनंत माटे यांनी मात्र, याचिका दाखल झाल्याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगितले आहे. माटे म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयामध्ये याबाबत याचिका दाखल करण्याची तयारी आम्ही केली होती. मात्र, ती दाखल झाली आहे का याबाबत काही कल्पना नाही. मात्र, महाविद्यालयाचे विद्यार्थी ही आमची जबाबदारी असून त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.’’