लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गटाकडून शहराध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवरून अजित पवार आणि शरद पवार गटात संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. या दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच शहर कार्यकारिणीच्या नव्या नियुक्तीवरून आगामी काळात दोन गटांतील संघर्ष तीव्र होणार आहे. त्याची पहिली ठिणगी शहर मध्यवर्ती कार्यालयाचा ताबा घेण्यावरून पडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांना शहरातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. हे सर्व पदाधिकारी अजित पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीलाही उपस्थित होते. शरद पवार यांनाही पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असला, तरी शरद पवार गटाचे पदाधिकारी अजित पवार गटाकडे येतील, असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक दीपक मानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मानकर यांची नियुक्ती केली असून, तसे नियुक्तिपत्र त्यांना देण्यात आले आहे.
आणखी वाचा-पार्थ पवारांचा पराभव करणारे खासदार श्रीरंग बारणे म्हणतात, “अजित पवार सरकारमध्ये आल्याने ताकद वाढली!”
जगताप-मानकर समोरासमोर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपूर्वी शहराध्यक्ष नियुक्ती करण्यावेळी दीपक मानकर शहराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होते. मात्र, प्रशांत जगताप यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शरद पवार यांना पाठिंबा देण्याचा ठराव शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. त्यामुळे आता जगताप-मानकर आमने-सामने येण्याची शक्यता आहे. या दोन्ही गटांकडून परस्परविरोधात कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, नव्या नियुक्ती करताना फोडाफोडीचे राजकारण पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.
शहर कार्यालयावरून वादाची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्यवर्ती कार्यालयावरून या दोन गटांत संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीनगर परिसरात काही महिन्यांपूर्वी शहर कार्यालयाची उभारणी करण्यात आली होती. त्याचा करारनामा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाने करण्यात आला आहे. त्यामुळे शहर मध्यवर्ती कार्यालयाचा ताबा कोणी घेतला तर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा प्रशांत जगताप यांनी यापूर्वीच दिला आहे. अजित पवार गटाकडून शहराध्यक्षाची नियुक्ती करण्यात आल्याने या गटाचे कामकाज कोठून होणार, हा प्रश्न असून त्यासाठी शहर मध्यवर्ती कार्यालयातूनच कामकाज केले जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या ताब्यावरून या दोन गटांत संघर्ष होण्याची शक्यता आहे.