उद्या जागतिक चिमणी दिवस साजरा होत आहे. अर्निबध शहरीकरणामुळे आणि बांधकामांमुळे शहरातून चिमण्या हद्दपार होत असताना अनेक पर्यावरणप्रेमी मंडळी चिमण्या वाचवण्याचा म्हणजे एकूणच पक्षी आणि पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न अथकपणे करत आहेत. ‘अलाईव्ह’ ही पुण्यातील पर्यावरणप्रेमींची संस्थाही अशाच प्रकारचे काम करते. ‘आयुका’मध्ये संशोधक सहायक म्हणून काम करत असलेला अलाईव्ह संस्थेचा सचिव चैतन्य राजर्षी याने ‘चला चिऊ वाचवू अभियाना’ची माहिती ‘लोकसत्ता’ला दिली.
जागतिक चिमणी दिवस (वर्ल्ड स्पॅरो डे) केव्हा सुरू झाला, त्याची पाश्र्वभूमी काय होती?
— पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत. तशा त्या इतर शहरांमध्येही आहेत. नाशिकच्या नेचर फॉर एव्हर सोसायटीने फ्रान्समधील इको-सिस अॅक्शन फाउंडेशन या संस्थेशी संपर्क साधला होता. चिमणीसारख्या नेहमी दिसणाऱ्या अनेक पक्ष्यांची संख्या कमी होत आहे, याकडे संस्थतर्फे लक्ष वेधण्यात आले होते. त्यातून जागतिक चिमणी दिवस साजरा करण्याचा निर्णय ऑगस्ट २०१० मध्ये झाला. प्रत्यक्षात २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने पर्यावरण क्षेत्रातील संस्था-संघटना उपक्रम करतात.
चिमण्यांचे महत्त्व काय?
— भारतात चिमण्यांच्या वीस प्रजाती आढळतात. त्यातल्या पाच तर महाराष्ट्रात आहेत. सर्वत्र आढळणारा हा पक्षी असला तरी एकूणच चिमणीचे रूप-रंग यामुळे या पक्ष्याकडे कोणी आकर्षण म्हणून बघत नाही. मात्र चिमण्यांचे महत्त्व खूप आहे. विशेषत: शेतकऱ्यांसाठी तर ते खूप आहे. शेतकऱ्यांचा मित्र असाच हा पक्षी आहे. पिकांवरील आळ्या आणि कीटक खाण्याचे चिमणीचे काम अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यामुळेच शेतीसाठी हा महत्त्वपूर्ण पक्षी आहे. कीड नियंत्रित करण्याचे काम चिमण्या करतात.
शहरांमधून चिमण्या कमी किंवा गायब होण्याची कारणे काय?
— आपण पुण्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की पूर्वी आपल्या शहरात वाडे होते. त्यामुळे वाडय़ात कोणत्याही वळचणीच्या जागी चिमण्या घरटे करत. वाडे जाऊन आता तेथे मोठय़ा इमारती उभ्या राहात आहेत. त्यामुळे चिमण्यांचा अधिवासच नष्ट होत आहे. जेथे सोसायटय़ा आहेत; पण थोडी माती शिल्लक आहे तेथे चिमण्या दिसतात. उर्वरित सर्व ठिकाणांहून मात्र चिमण्या गायब झाल्या आहेत. चिमणीला मुख्यत: तीन प्रकारचे स्नान आवश्यक ठरते. सूर्यप्रकाशातले स्नान, पाण्याचे स्नान आणि तिसरे मातीचे स्नान. शरीरावरील कीटक वगैरे हटवण्यासाठी चिमणी मातीचे स्नान करते. शहरीकरणामुळे मातीच शिल्लक नाही. परिणामी चिमण्या गायब झाल्याचे लक्षात येत आहे.
‘चला चिऊ वाचवू अभियान’ काय आहे?
— चिमणीसारखा छोटा पक्षी आपल्याला लहानपणापासून अनेक ठिकाणी भेटतो. चिमणी कवितांमध्ये आहे, धडय़ांमध्ये आहे, पंचतंत्राच्या गोष्टींमध्ये आहे. लहानमुलांना सुरुवातीला चिऊ-काऊच्याच गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे आम्ही हे अभियान सुरू केले आहे. दरवर्षी त्या निमित्ताने आम्ही विविध कार्यक्रम करतो. संस्थेने रविवारी (२० मार्च) राजेंद्रनगरमधील इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रात सकाळी दहापासून विद्यार्थी-पालक व नागरिकांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. चिमणीवरील कवितांचे वाचन, चला चिऊ वाचवू या विषयावर व्याख्यान, टाकाऊतून टिकाऊ अशी चिऊताईची घरटी तयार करण्याचे प्रशिक्षण, पक्षी, प्राणी, वृक्ष, फुलपाखरे या घटकांवर प्रश्नमंजुषा असे कार्यक्रम या कार्यशाळेत होतील. सर्वासाठी ही कार्यशाळा नि:शुल्क आयोजित केली जाते.
संस्थेच्या पर्यावरणविषयक उपक्रमांविषयी काय सांगाल?
— आमच्या अलाईव्ह (पूर्वीची स्वतिश्री) संस्थेतर्फे आम्ही पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम करतो. आपल्या परीने जेवढे पर्यावरण रक्षण करता येईल, तेवढे करायचे हा आमचा संकल्प आहे. हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत आणि मुख्यत: शालेय विद्यार्थ्यांपर्यंत, नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम आयोजित करतो. शालेय वयातच विद्यार्थ्यांवर हे संस्कार झाले तर ते कायमस्वरूपी टिकतील हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी आम्ही अनेक कार्यक्रम-उपक्रम सातत्याने करतो. वृक्षारोपणाचे मोठे कार्यक्रम न करता आमच्या ज्या ज्या कार्यक्रमात वृक्षारोपण केले जाते त्यातील प्रत्येक झाडाची जबाबदारी कोणा ना कोणाकडे दिली जाते. संस्थेचे अध्यक्ष उमेश वाघेला पक्षी अभ्यासातील जाणकार मानले जातात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार एक दिवस निसर्गासाठी, पक्षीनिरीक्षण, पक्षी अभ्यास, पुणे परिसरात देशी वृक्ष लागवड असे अनेक कार्यक्रम संस्थेतर्फे केले जातात.