शहरासह जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाअंतर्गत महाविद्यालयांमध्ये नवतरुण मतदारांसाठी खास शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२३ या पात्रता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार ९ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत या खास विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. वयाची १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व पात्र नवमतदारांना नोंदणीसाठी ८ डिसेंबरपूर्वी अर्ज क्रमांक सहा भरून मतदार नोंदणी करता येणार आहे.
हेही वाचा >>>पुणे: ‘पीएमपी’चे ग्रामीण भागातील अकरा मार्ग बंद; उद्यापासून अंमलबजावणी
या शिबिराचे २५ नोव्हेंबरला एकाच वेळी ४५० महाविद्यालयांमध्ये आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र युवा मतदारांनी या खास शिबिरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक सहा त्यांच्या महविद्यालयात शिबिरादरम्यान भरून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.