नवीन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस आयुक्तालयात तक्रारी किंवा गाऱ्हाणी घेऊन येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास विचारात घेऊन आयुक्तालयाच्या आवारात ज्येष्ठ नागरिकांसाठी खास कक्ष उभारण्यात येत आहे. ज्येष्ठांच्या या खास कक्षाचे काम अंतिम टप्यात आले असून नवीन वर्षांत या कक्षाचे उद्घाटन होऊन कक्षाचे कामकाज सुरू होईल.

पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग कक्षाच्या अखत्यारीत ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण कक्षाचे कामकाज सध्या सुरू आहे. तेथे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यात येतात. ही जागा अपुरी आहे. त्यामुळे ज्येष्ठांची गैरसोय होते. तक्रारदार ज्येष्ठांनी कोणत्याही दडपणाखाली तक्रार देऊ नये तसेच तेथील वातावरणही चांगले असावे, या विचाराने पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ज्येष्ठांसाठी नवीन कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर ज्येष्ठांसाठीच्या तक्रार निवारण कक्षाची इमारत बांधण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम अंतिम टप्यात आले असून जानेवारी महिन्यात या कक्षाचे उद्घाटन करण्यात येईल. नवीन कक्ष प्रशस्त असेल. तेथे ज्येष्ठांना बसण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध असेल. कक्षात सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायांची नेमणूक करण्यात येणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांची संख्या अधिक आहे. अनेकांची मुले नोकरीनिमित्त परदेशात तसेच देशातील अन्य शहरात वास्तव्यास आहेत. एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सन २००५ मध्ये खास कक्ष कार्यान्वित करण्यात आला. त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑगस्ट महिन्यात खास हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्येष्ठांना त्यांच्या तक्रारी १०९० या क्रमांकावर करता येतात.

ज्येष्ठांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पोलिसांनी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या अंतर्गत शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या महासंघासोबत नियमित बैठका आयोजित करण्यात येतात. ज्येष्ठांना खास ओळखपत्र पोलिसांकडून देण्यात आले आहे. त्यावर त्यांचे नाव, पत्ता, तसेच शारीरिक व्याधींची माहिती देण्यात आली आहे. जेणेकरून एकटे राहणारे ज्येष्ठ काही कामानिमित्त बाहेर पडले. तर त्याचा फायदा त्यांना व्हावा, हा यामागचा हेतू आहे. ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण कक्षाच्या      माध्यमातून आतापर्यंत शहरातील साडेचार हजार ज्येष्ठांची नोंदणी करण्यात आली आहे. नजीकच्या पोलीस ठाण्यांना एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांची माहिती उपलब्ध क रून देण्यात आली आहे. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकांनी नियमित ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट द्यावी तसेच त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. काही ज्येष्ठ नागरिकांकडे पारपत्र नाहीत. एखाद्या ज्येष्ठाने पारपत्रासाठी पोलिसांकडे पडताळणी करण्यासंदर्भात संपर्क साधला, तर त्याला पोलीस ठाण्यात बोलावू नये. ज्येष्ठांच्या घरी जाऊन पारपत्रासंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी, अशा सूचना पोलीस आयुक्त शुक्ला यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण कक्षाचे कामकाज वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील पाहत आहेत. ज्येष्ठ नागरिक पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रारी करतात. तक्रारींचे स्वरूप पाहून पोलिसांकडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. यंदाच्या वर्षी नोव्हेंबर अखेरीपर्यंत २२०७ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

काय घडणार ?

* पोलीस आयुक्तालयात ज्येष्ठांची विशेष काळजी

*  तक्रारींसाठी स्वतंत्र कक्ष होणार

*  प्रशस्त जागाही उपलब्ध होणार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special cell for senior citizens in police commissioner office