लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कोरेगाव भीमा येथील २०६ व्या शौर्य दिनानिमित्त लाखो अनुयायांनी विजयस्तंभास अभिवादन केले. अभिवादनासाठी अनुयायी आणि नेत्यांची उपस्थिती लक्षात घेत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून त्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.
सीसीटीव्हीद्वारे परिसरावर नजर राहणार असून त्यासाठी सुसज्ज नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्रभारी सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा,अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आधी अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत
राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तसेच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोमवारी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केले.
आणखी वाचा-भीमा कोरेगाव विजयस्तंभाला आंबेडकरी अनुयायांचे अभिवादन; अलोट गर्दी
समता सैनिक दल, महार रेजिमेंट सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली.विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून यावर्षी अधिक अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेवून अधिक प्रमाणात सुविधा करण्यात आल्या आहेत. २९ ठिकाणी आरोग्य कक्ष उभारण्यात आले आहे. २० फिरते दुचाकी आरोग्य पथक, ५० रुग्णवाहिका, ९० तज्ज्ञ डॉक्टर आणि २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयात १०० खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. औषधसाठा ही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे. स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता दीडशे पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच हिरकणी कक्ष उभारण्यात आले असून या ठिकाणी स्वतंत्र महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आणखी वाचा-पुणे : चंदननगरमध्ये महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या आईवर तरुणाचा हल्ला
कोरेगाव भीमा परिसरातील विविध ठिकाणी एकूण २ हजार २०० तात्पुरती स्वच्छतागृहांची सुविधा देण्यात आली असून पाण्यासाठी ४० टँकर आणि स्वच्छतेसाठी ४० सक्शनमशीन आणि १५ जेटींग मशीन ठेवण्यात आले आहेत. रस्त्यावर कचरा साचू नये याकरीता ५०० कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी २०० सफाई कामागार नियुक्त करण्यात आले आहेत. कचरा उचलण्याकरिता ८० घंटागाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
पोलिसांकडूनही बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांना सूचना देण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनिक्षेपकांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तही पुरेशा प्रमाणात ठेवण्यात आला आहे.