रसायनविरहित गूळही मार्केट यार्डात
पुणे : मकर संक्रातीसाठी लागणाऱ्या चिक्की गुळाची आवक बाजारात वाढली असून तिळवडी, गूळ पोळी, लाडू, चिक्की आदी पदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांकडून चिक्की गुळाला चांगली मागणी आहे.
बाजारात एक आणि अर्धा किलोच्या खोक्यात चिक्की गूळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. चिक्की गुळाबरोबरच रसायनविरहित गूळही बाजारात आला असून त्या गुळालाही मागणी आहे. पुणे जिल्ह्य़ातील दौंड, केडगाव आणि सातारा जिल्ह्य़ातील कराड, पाटण येथून, तसेच सांगली, कोल्हापूर भागातून मार्केट यार्डातील भुसार बाजारात चिक्की गूळ विक्रीसाठी पाठविला जात आहे. चिक्की गुळाचा वापर तिळगूळ, गूळ पोळी, गोडी शेव, चिक्की आदी पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जातो. चिक्की गुळाला घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ३६०० ते ४००० रुपये भाव मिळाला आहे. रसायनविरहित गुळाला ३३०० ते ३९०० रुपये असा भाव मिळाला असल्याचे भुसार बाजारात गूळ व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले.
गेल्या पंधरा दिवसांपासून बाजारात चिक्की गुळाची आवक वाढली आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज गुळाच्या ५०० ते १००० खोक्यांची तसेच ८०० ते १००० गुळाच्या ढेपांची आवक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रसायनविरहित गुळाला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. रसायनविरहित गूळ आरोग्याच्या दृष्टीने चांगला मानला जातो. थंडीत गुळाला मागणी वाढते. मार्केट यार्डातील बाजारातून चिक्की गूळ खरेदी करून खाद्यपदार्थ व्यावसायिक त्यापासून संक्रातीसाठी लागणारे खाद्य पदार्थ तयार करतात. संक्रातीनंतर यात्रा, उत्सवांचा काळ असतो. त्यामुळे या कालावधीत गुळाला चांगली मागणी असते आणि गुळाला भाव चांगला मिळतो. त्यामुळे या काळात गुळाची आवक मोठय़ा प्रमाणावर वाढते. चिक्की गूळ अर्धा किलो, एक किलो तसेच दहा किलोच्या खोक्यांमध्ये उपलब्ध असल्याचे बोथरा यांनी सांगितले.
गुळाचा भाव
३६०० ते ४००० रुपये
चिक्की गूळ (प्रतिक्विंटल)- ५० ते ६० रुपये
प्रतिकिलो. किरकोळ बाजारातील चिक्की गुळाचा भाव