साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ संस्थेतर्फे कला, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात कार्यरत असलेल्या विशेष व्यक्तींचे शनिवारपासून (१४ फेब्रुवारी) दोन दिवस देवाची आळंदी येथे साहित्य संमेलन होणार आहे. अंध-अपंग, मूक-बधिर अशा दहा टक्क्य़ांहून अधिक लोकसंख्येतील सृजनशीलतेला व्यासपीठ देण्याच्या उद्देशातून हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे पाली भाषा विभागप्रमुख डॉ. महेश देवकर यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडेदहा वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. दिल्ली येथील ज्येष्ठ अपंग साहित्यिक डॉ. प्रेमसिंग या संमेलनाच्या अध्यक्ष असतील. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, आंध्र प्रदेशातील कृषी आणि सहकार विभागाचे उपसचिव बालाजी मंजुळे, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख वैकुंठ कुंभार आणि नीलेश छडवेलकर यांनी मंगळवारी दिली.
निमंत्रितांचे कविसंमेलन, मूक-बधिर व्यक्तींच्या मुलाखतींचा समावेश असलेले ‘होय! मलाही बोलायचयं!’, संमेलनामध्ये प्रकाशित होणाऱ्या साहित्याच्या लेखक आणि प्रकाशकांचे मनोगत, ‘आधुनिकीकरण : साहित्य निर्मिती आणि संवर्धन’ या विषयावर परिसंवाद, विशेष व्यक्तींच्या मुलाखतींचा समावेश असलेले ‘यशोगाथा’, ‘अपंगत्व-पालकत्व’, ‘अपंगांची विशेष भाषा आणि ब्रेल लिपी’, ‘अपंगांचे साहित्य आणि प्रसार माध्यमांची भूमिका’ या विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, आमदार बच्चू कडू, अपंग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे आणि सामाजिक कार्यकर्ते बलराज बिष्णोई यांच्या उपस्थितीत रविवारी (१५ फेब्रुवारी) सायंकाळी चार वाजता या संमेलनाचा समारोप होणार आहे.
विशेष व्यक्तींचे साहित्य संमेलन येत्या शनिवारपासून आळंदीला
अंध-अपंग, मूक-बधिर अशा दहा टक्क्य़ांहून अधिक लोकसंख्येतील सृजनशीलतेला व्यासपीठ देण्याच्या उद्देशातून हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
First published on: 11-02-2015 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special child sahitya sammelan alandi