परगावी निघालेल्या प्रवाशांना सोडण्याच्या बहाण्याने त्यांना लुटणाऱ्या चोरट्यांना विशेष न्यायाधीस एस. एम. नावंदर यांनी सात वर्ष सक्तमजुरी आणि १५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ललित दीपक खोल्लम (वय ३८, रा. मावळ), मयूर दिलीप राऊत (वय २८) अशी शिक्षा सुनावलेल्या दोघांची नावे आहेत. या खटल्यात विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी काम पाहिले.
हेही वाचा >>> प्राधिकरणातील जागा मालकांना ‘प्रॉपर्टी कार्ड’ वाटपाची प्रक्रिया वर्षभरात पूर्ण करणार; शंभुराज देसाई यांची विधानसभेत माहिती
आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती त्यांनी युक्तीवादात केली होती. आरोपी खोल्लम आणि राऊत यांना १५ सप्टेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून चोरीची मोटार, २० मोबाइल संच, एअर गन, टॅब, नऊ सीमकार्ड, पिस्तूल आणि दोन काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याबाबत राजू दामोदर सणगर (वय ३८, रा. दौलतनगर, शिवाजी विद्यापीठ रस्ता, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. कोल्हापुरातील एका खासगी कंपनीत सणगर व्यवस्थापक आहेत. या कंपनीची मुख्य शाखा मुंबईतील ऑपेरा हाऊस येथे आहे. पुण्यात या कंपनीच्या दोन शाखा आहे. कात्रज येथील शाखेतील काम संपल्यानंतर सणगर ४ सप्टेंबर २०१५ रोजी कोल्हापुरला निघाले होते. ते एसटी बसची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी आरोपी मोटारीतून आले आणि काेल्हापुरला सोडतो, अशी बतावणी केली.
हेही वाचा >>> खत खरेदी- जात प्रकरणावर संसदेत आवाज उठवणार- सुप्रिया सुळे
कात्रज घाटात आरोपी खोल्लम, राऊत यांनी मोटार थांबविली. पाठोपाठ दुचाकीवरुन त्यांचे दोन साथीदार आले. सणगर यांना पिस्तुलाचा धाक दाखवून आरोपींनी सोन्याचा गोफ, मोबाइल संच, रोकड, डेबीट कार्ड असा मुद्देमाल लुटला. त्यानंतर चोरट्यांनी सणगर यांना कोंढणपूर ते सिंहगड किल्ला रस्त्यावर सोडले. घाबरलेल्या सणगर यांनी त्या वेळी पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. दरम्यान, १५ सप्टेंबर रोजी पोलिसांनी आरोपींना अटक केल्याची बातमी सणगर यांनी वाचली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. या खटल्याचे कामकाज आठ वर्ष चालले. न्यायालयाने साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरुन आरोपींना सात वर्ष सक्तमजुरी आणि १५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.