पुणे : आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच देशभरात दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या पाच दहशतवाद्यांना दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयाने शिक्षा सुनावली. याप्रकरणात पुण्यातील एका तरुणीसह दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. वेगवेगळ्या कलमान्वये दहशतवाद्यांना दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जहानजेब सामी वाणी, त्याची पत्नी हिना बशीर बेग (दोघे रा. ओखला विहार, जामियानगर), सादिया अन्वर शेख (रा. विश्रांतवाडी, पुणे) नबील एस. खत्री (रा. कोंढवा, पुणे), अब्दूर बसित अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. मार्च २०२० मध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) जहानजेब वाणी आणि त्याची पत्नी हिना यांना अटक केली होती. आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार आणि देशविघातक कारवायांमध्ये दोघे सामील असल्याचे उघड झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आरोपी देशातील महत्वाच्या शहरात बाॅम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासात मिळाली होती. त्यानंतर याप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयएन) सुरू केला.

हेही वाचा – मतदानानंतर खासदार सुप्रिया सुळे काटेवाडीत अजित पवार यांच्या भेटीला ?

तपासात मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील सादिया अन्वर शेख, नबील एस. खत्री सामील असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर दोघांना एनआयएच्या पथकाने पुण्यातून अटक केली होती. चौकशीत बंगळुरूतील डाॅक्टर अब्दूर रहमान याचे नाव निष्पन्न झाले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयसिसच्या दहशवादी विचारधारेच्या प्रभावाखाली आलेला डाॅ. रहमान डिसेंबर २०१३ मध्ये सिरियात गेल्याचे निष्पन्न झाले. सिरियात आयसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये डाॅ. रहमान सामील झाल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणात पाचजणांविरुद्ध एनआयएने २० मार्च २०२० रोजी दिल्लीतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर पुरवणी आरोपपत्र १२ जानेवारी २०२१ रोजी दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा – बारामतीत पहिल्या चार तासांत किती मतदान? जाणून घ्या सविस्तर

दिल्लीतील विशेष न्यायालयाने आरोपी जहानजेब सामीला याला विविध कलमान्वये दोषी ठरवून २० वर्षांची शिक्षा सुनावली. त्याची पत्नी हिना बेग हिला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सादिया शेखला सात वर्षे, तसेच नबील खत्रीला आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. अब्दुर बसित याला शिक्षा सुनावण्यात आली. त्याने शिक्षेचा कालावधी न्यायलयीन कैदेत पूर्ण केला आहे. बसितने आयसिसच्या दहशवादी विचारधारेचा प्रसार करण्यासाठी सामीला ‘व्हाॅईस ऑफ हिंद’ हे मासिक सुरू करण्यासाठी मदत केली होती. या खटल्यात डाॅ. रहमानविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, अद्याप त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special court in delhi sentenced five isis terrorists forced labor for two including a young woman from pune pune print news rbk 25 ssb