लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना कागदावरच राहिली आहे. योजनेला शासनाची मान्यता न मिळाल्याने चार वर्षांत योजनेची अंमलबजावणीच झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमर एकाड यांनी मागितलेल्या माहितीला बार्टीच्या योजना प्रमुख स्नेहल भोसले यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही बाब स्पष्ट झाली आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झालेल्या राज्यातील अनुसूचित जातीच्या आर्थिक दुर्बल घटकांतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी बार्टीतर्फे नव्याने व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या जेईई, नीट, सीईटी अशा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना २०२०-२१ मध्ये प्रस्तावित करण्यात आली होती. त्यात विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी एक लाख रुपये प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येणार होती.

योजनेअंतर्गत बार्टीकडे ४ हजार १५९ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. अर्जांची छाननी केल्यावर ३ हजार १४९ विद्यार्थी योजनेत पात्र ठरले. मात्र, बार्टीच्या नियामक मंडळाने केवळ शंभर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यास मान्यता देत उर्वरित विद्यार्थी, वाढीव निधीसाठी २०२३ मध्ये शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला असता शासनाकडून मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे ही योजना कार्यान्वितच न झाल्याने त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही, अशी माहिती बार्टीकडून देण्यात आली.

जेईई, नीट प्रशिक्षणासाठी स्वतंत्र योजना सुरू

बार्टीच्या नियामक मंडळाच्या निर्णयानुसार अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील, तसेच ८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील सात विभाग स्तरावर जेईई, नीटचे प्रशिक्षण देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात जेईईसाठी सहाशे आणि नीटसाठी सहाशे अशा एकूण १२०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची ही योजना आहे. त्यात प्रति विद्यार्थी २ लाख ४९ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. २०२३-२५ आणि २०२४-२६ अशा दोन तुकड्यांमध्ये नागपूर, लातूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक विभागासाठी १ हजार ८३७ विद्यार्थ्यांना जेईई, नीटचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही बार्टीकडून स्पष्ट करण्यात आले आहे

Story img Loader