कलावंताला त्याच्या कामाची पोचपावती आणि पुढच्या वाटचालीसाठीची ऊर्जा पुरस्कारातून मिळत असते. कलेच्या प्रांतात पुणेकरांची दादही महत्त्वाची मानली जाते आणि अशा पुणेकर रसिकांच्या वतीने महापालिकेने दिलेला पुरस्कार ही माझ्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट आहे, अशी भावना ज्येष्ठ भरतनाटय़म नृत्यांगना गुरू सुचेता भिडे-चाफेकर यांनी शनिवारी व्यक्त केली.
महापालिकेतर्फे यंदाचा गुरू स्व. पंडिता रोहिणी भाटे पुरस्कार सुचेता भिडे-चाफेकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. सन्मानचिन्ह, शाल आणि पन्नास हजार रुपये अशा स्वरूपाचा हा पुरस्कार महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते सुचेता भिडे यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सतीश आळेकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. उपमहापौर आबा बागुल, मनीषा साठे, शमा भाटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मंजिरी कारुळकर (कथ्थक), आभा औटी (कथ्थक), शीतल ओक (वेशभूषा), शेखर कुंभोजकर (गायन) आणि हर्षवर्धन पाठक (प्रकाशयोजना) यांचाही सन्मानचिन्ह आणि दहा हजार रुपये अशा स्वरूपाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महापौर धनकवडे यांनी प्रास्ताविक, प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन आणि उपमहापौर बागुल यांनी आभारप्रदर्शन केले.
गुरुवर्या रोहिणी भाटे यांचे कथ्थक विश्वातील योगदान जगजाहीर आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने मी प्रभावित झाले होते. रोहिणीताई म्हणजे नृत्यविश्वातील तळपते नक्षत्र होत्या, असे सुचेता भिडे यांनी सांगितले.
नृत्याची दाक्षिणात्य शैली महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न जसा रोहिणी भाटे यांनी केला तसाच प्रयत्न सुचेता भिडे यांनीही केला आहे. त्या आयुष्यावर प्रेम करणाऱ्या बाई आहेत. नृत्य करतानाची त्यांच्यातील ऊर्जा त्या परावर्तीत करतात. नृत्यामध्ये ऊर्जा कशी असावी याचे त्या उदाहरण आहेत, अशा शब्दांत डॉ. आळेकर यांनी सुचेता भिडे यांचा गौरव केला.
मनीषा साठे यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमात कलावर्धिनी, रोचित कला अॅकॅडमी, मनीषा नृत्यालय आणि नादरूप संस्थेच्या वतीने कथ्थक व भरनाटय़मचे सादरीरकण झाले.
नाटय़गृह नाटकांना खुले करावे
महापालिकेने बांधलेल्या विजय तेंडुलकर नाटय़गृहाच्या उद्घाटनासाठी दोन वर्षांपूर्वी आलो होतो. मात्र गेल्या दोन वर्षांत नाटय़गृहात नाटक झाल्याचे दिसले नाही. चांगले, सुसज्ज असे हे नाटय़गृह आहे. महापालिकेने ते नाटकांसाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुले केले पाहिजे. अशा वास्तूंची ओळख लोकांना होण्यासाठी या वास्तू नाटय़प्रयोगांसाठी द्याव्यात. महापालिकेने सुरू केलेल्या पुरस्काराची रक्कमही वाढवली पाहिजे. त्या बरोबरच गुरू रोहिणी भाटे यांच्या नावाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अध्यासन सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने एक ठराव संमत करून एक ते पाच कोटींपर्यंतची रक्कम विद्यापीठाला ठेव स्वरूपात दिल्यास हे अध्यासन सुरू होऊ शकेल, अशा अपेक्षा कार्यक्रमात बोलताना डॉ. सतीश आळेकर यांनी व्यक्त केल्या.

Story img Loader