समाजातील विषमता आणि वैर दूर करण्याच्या उद्देशातून समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून साने गुरुजी यांनी स्थापन केलेले ‘साधना’ साप्ताहिक १५ ऑगस्ट रोजी ६५ वर्षे पूर्ण करीत आहे. चित्रपटाच्या शताब्दीचे औचित्य साधून ‘चित्रपट’ या विषयावर यंदाचा वर्धापनदिन प्रकाशित करण्यात येणार आहे.
‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा’ या विषयावर कलावंत, तज्ज्ञ आणि समाजधुरीण अशा २५ मान्यवरांनी लेखन केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्या उपस्थितीत सोमवारी (१२ ऑगस्ट) होणार आहे. तर, साधना साप्ताहिकाच्या वर्धापनदिनानिमित्त १७ ऑगस्ट रोजी प्रा. सुहास पळशीकर यांच्या ‘राजकारणाचा ताळेबंद’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यानिमित्ताने ‘आयबीएन लोकमत’चे संपादक निखिल वागळे हे पळशीकर यांची मुलाखत घेणार आहेत, अशी माहिती साधना ट्रस्टचे विश्वस्त प्रा. रा. ग. जाधव आणि साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आणीबाणीमध्ये काही काळ साधना साप्ताहिकावर बंदी आली होती. त्या वेळी सहा महिन्यांचे २४ अंक हे साने गुरुजींनी स्थापन केलेल्या ‘कर्तव्य’ या सायंदैनिकाच्या नावाने प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे गेल्या ६५ वर्षांत अंक प्रकाशनाच्या सातत्यामध्ये एकदाही खंड पडलेला नाही. साधना ट्रस्ट हा भरभक्कम पायावर उभा आहे. प्रा. ग. प्र. प्रधान सरांनी त्यांचे घर ‘साधना’ला दिल्याने आता अर्थकारण सक्षम झाले आहे. या विचाराधिष्ठित साप्ताहिकाचे किमान सात हजार वर्गणीदार आहेत. ध्येयवाद कायम ठेवून साधना साप्ताहिकाने कालानुरुप बदल केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader