आर्थिक विकासाशिवाय सामाजिक न्यायाची संकल्पना अवघड असते. राज्याचा आर्थिक विकास होत असताना सामाजिक न्यायाचा समतोल शरद पवार यांनी योग्यपणे पार पाडला. या दोन्ही गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचे कसब पवार यांच्या नेतृत्वामध्ये आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी व्यक्त केले.
सामाजिक न्याय परिषदेतर्फे परिषदेचे अध्यक्ष आमदार जयदेव गायकवाड आणि कार्याध्यक्ष अरुण खोरे यांनी संपादित केलेल्या ‘कृतिशील परिवर्तनवादी शरद पवार’ या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. महापौर चंचला कोद्रे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, आमदार बापू पठारे, सभागृहनेते सुभाष जगताप, स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, अॅड. भगवान साळुंखे आणि वाल्मिक जगताप या प्रसंगी उपस्थित होते.
मोरे म्हणाले, ‘‘खेळपट्टीवर टिकून राहा. धावा आपोआप होतात, अशी संकल्पना क्रिकेटमध्ये आहे. त्याच धर्तीवर १९७८ पासून सलग ३५ वर्षे पवार राजकारणात टिकून आहेत. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्राचे राजकारण पवारकेंद्री आहे. सत्ता गमावण्याचा धोका पत्करून त्यांनी केलेला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार आणि महिला आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याचे त्यांनी दाखविलेले धाडस ही त्याचीच उदाहरणे आहेत. सध्या देशात आघाडी सरकारचे युग आहे. मात्र, असे सरकार कसे चालवावे याचा वस्तुपाठ पवार यांनी ‘पुलोद’च्या माध्यमातून पूर्वीच घालून दिला आहे.’’
चंचला कोद्रे आणि जयदेव गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून पवार यांचे पैलू उलगडले. अरुण खोरे यांनी सूत्रसंचालन केले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2013 रोजी प्रकाशित
आर्थिक विकास व सामाजिक न्यायाचा योग्य समतोल शरद पवार यांनी साधला – डॉ. सदानंद मोरे यांचे मत
अरुण खोरे यांनी संपादित केलेल्या ‘कृतिशील परिवर्तनवादी शरद पवार’ या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले.
First published on: 22-12-2013 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special issue on sharad pawar published by dr more sadanand