पुणे आणि खाणे यांचे एक अतूट नाते आहे. पुण्यातल्या अनेक खाद्यपदार्थानी जगभरातील खवय्यांना भुरळ पाडली आहे. येथील खाद्यसंस्कृतीला कसलेच वावडे नाही. त्यामुळे नाना प्रकारचे पदार्थ येथील खाऊगल्ल्यांमध्ये दिसतात. अशाच खाऊगल्ल्या आणि वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थाच्या स्थळांचा वेध घेणारे हे सदर. आज जाऊया शनिवार पेठेतल्या ‘झकास’मध्ये..
‘येथे कोल्हापुरी मिसळ मिळेल..’ ही पाटी पुण्यात हल्ली अगदी टपरीछाप हॉटेलमध्येही हमखास दिसते. अनेक हॉटेलमधील ‘कोल्हापुरी मिसळी’च्या या पाटय़ा वाचून आणि त्या मिसळीची चव चाखलेल्या एकाच्या मनात आलं, की आता अस्सल कोल्हापुरी चवीची मिसळ बनवून ती पुणेकरांना खिलवली पाहिजे. नुसत्या कल्पनेवर न थांबता त्यानं या कल्पनेचा पाठपुरावाही केला आणि त्यातूनच शनिवार पेठेत साकारलं.. झकास..
मूळचा कोल्हापूरकर संतोष भोसले यानं सुरू केलेलं ‘झकास’ खरोखरीच नावाप्रमाणे एकदम झकास असंच. संतोषने त्याचे मेव्हणे अशोक एरंडे यांच्या बरोबर ‘झकास’ सुरू करून आता दीड वर्ष झालंय. अस्सल कोल्हापुरी चवीचे पदार्थ बनवणं ही संतोषची खासियत. त्यामुळे ‘झकास’चा प्रतिसाद वाढतोय आणि संतोषचा या व्यवसायात झकास जम बसलायं. ‘झकास’ सुरू झालं तेव्हा पिठलं-भाकरी, कोल्हापुरी कट वडा आणि कोल्हापुरी मिसळ असे तीन पदार्थ तिथे मिळायचे. जसजसा खवय्यांचा प्रतिसाद वाढला तशी मग पदार्थाची यादीही लांबत गेली. पुढे मटकी उसळ-भाकरी, शेवभाजी-भाकरी, पोळी भाजी, गोल भजी, कांदा भजी, बटाटा भजी, पोहे, उपीट, शिरा, पुलाव, मठ्ठा, लिंबू सरबत, कोकम सरबत, सोलकढी असे अनेक प्रकार खवय्यांच्या भेटीला आले. या वैविध्यपूर्ण पदार्थामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी आणि दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी ‘झकास’ हे एक मस्त ठिकाण झालं आहे. शिवाय दरही अवाच्यासवा नसल्यामुळे इथलं जेवण चवीचा आनंद तर देतंच, शिवाय खूप खर्च होत नसल्यामुळे तोही एक आनंद मिळतो तो वेगळाच. पोळी भाजी प्लेट इथे चाळीस रुपयांना मिळते. मटकी उसळ किंवा पिठलं, दोन भाकरी, एक वाटी भात,घट्ट दही, चविष्ट खर्डा, कांदा, लिंबू असा जेवणाचा मस्त बेत असलेली थाळी शंभर रुपयात, तर शेवभाजी थाळी एकशेवीस रुपयात मिळते.
अस्सल कोल्हापुरी चवीचे आणि तिखटजाळ नसलेले पदार्थ हे जसं ‘झकास’चं एक वैशिष्टय़, तसं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे इथे कोणताही पदार्थ कधीही तयार नसतो. तुम्ही दचकू नका. पदार्थ तयार करून ठेवायचा नाही हेच संतोषचं तत्त्व आहे. तुम्ही कोणतीही ऑर्डर दिलीत की संतोष गॅस सुरू करतो आणि हळूहळू आपली मटकी उसळ किंवा पिठलं किंवा शेवभाजी किंवा खिचडी, किंवा पुलाव असे पदार्थ आपल्यासमोरच तयार व्हायला लागतात. भाकरीची ऑर्डर भरपूर असली तरी भाकऱ्या आधी तयार करून ठेवायची पद्धत इथे नाही. त्यामुळे तव्यावरची गरम आणि फुगलेली भाकरीच आपल्या ताटात येते. अशी भाकरी बनवण्याचं संतोषचं कसब अनुभवण्यासारखचं.
पुण्यात मिसळीवर सँपल ओतलं जातं आणि तिखट खाणाऱ्यांना र्ती दिली जाते. कोल्हापूर भागात र्तीला कट म्हणण्याची पद्धत आहे. ‘झकास’ची मिसळ अस्सल कोल्हापुरी थाटाची. संतोष खूप छान समजावून सांगतो हे. आमच्या र्तीच्या मसाल्यात आम्ही भरपूर सुकं खोबरं वापरतो. त्यामुळे र्ती तयार करताना त्या खोबऱ्याचं जे तेल सुटतं तेच आमच्या र्तीतलं तेल. र्तीसाठी वेगळं जादा तेल मी अजिबात वापरत नाही, असं संतोष सांगतो. ‘झकास’च्या मिसळीतही खास कोकणातून मागवला जाणारा भाजक्या पोह्य़ांचा चिवडा आणि कोल्हापूरची शेव वापरली जाते. बरोबर मटकी उसळ आणि सुकी बटाटा भाजी, त्यावर कट असा मिसळीचा चमचमीत बेत इथं जमून येतो. ज्यांना नाश्ता करायचाय त्यांच्यासाठी पोहे, शिरा, उपीट हेही पदार्थ इथे ऑर्डरनुसारच तयार केले जातात. ‘कमी बनवायचं, पण ताजं बनवायचं हा आमचा नियमच आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक पदार्थ घरच्या चवीचा आणि गरम गरम मिळतो,’ असं अशोक एरंडे आवर्जून सांगतात.
तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ बनवण्याचं वेड संतोषचं बालपणापासूनचं. सहावी ते दहावीपर्यंतचं शिक्षण घेताना तो कोल्हापुरात एका भेळेच्या गाडीवर दोन रुपये रोजानं काम करत होता. पुढे शाळा सुटली आणि नोकरीसाठी संतोष पुण्यात आला. बिबवेवाडीचं कृष्णाई हॉटेल, वाल्हेकरवाडीचं शेतकरी हॉटेल, नंतर पुरेपूर कोल्हापूर असा प्रवास करत करत, अनुभव घेत घेत कोल्हापुरी थाटाचे आणि चवीचे पदार्थ बनवण्यात तो चांगलाच तरबेज झाला. इथल्या भेटीत खवय्यांची दाद अशीच असते..वा..झकास..