पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहीम राबवून मध्यरात्री गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. रात्रीत, पोलिसांनी दीड हजार जणांची तपासणी केली. त्यामध्ये सव्वासातशे गुन्हेगार आढळले. त्यासोबतच वेगवेगळ्या भागातही ५४ कारवाया करून ५७ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी वाहनांची तपासणी केली.

शहरातील गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. वाहनांची तोडफोड तसेच मारहाणीच्या घटना अधून-मधून घडत असतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अचानक पोलिसांकडून गुन्हेगारांची तपासणीची कारवाई करण्यात येते. या पार्श्वभूमीवरच बुधवारी रात्री शहरातील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.

गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दीड हजार गुन्हेगारांपैकी सव्वासातशे गुन्हेगार पोलिसांना आढळून आले. त्यासोबत बेकायदा सुरू असलेल्या जुगार अड्डे, हातभट्टी तसेच इतर प्रकारांवरही कारवाई करण्यात आली.

विशेष मोहिमेतील कारवाई

  • गुन्हे शाखेने गावठी दारू अड्डे उद्धवस्थ करून ६ गुन्हे दाखल, २१ हजारांचा ऐवज जप्त
  • स्थानिक पोलिसांकडून वेगवेगळ्या भागात ३१ प्रकरणात जुगार साहित्य जप्त
  • महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार सहा तडीपार गुन्हेगारांवर कारवाई
  • शहरातील ३८८ उपाहारगृहे, ढाबे आणि लॉजची तपासणी
  • रेल्वे स्थानक, एसटी बसेसची पाहणी
  •  नाकांबदी करून संशयित १ हजार २२७ वाहनांची तपासणी करून सव्वादोन लाखांचा दंड वसूल
  • वाहतूक शाखेने ९९९ वाहनांची तपासणी करून २ लाख १२ हजारांची दंडात्मक कारवाई

Story img Loader