पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी (बीएचआर) गैरव्यवहार प्रकरणातील एका आरोपीच्या जामीन अर्जास विरोध न करण्यासाठी एक कोटी २२ लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा जळगाव पोलिसांकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत सूरज सुनील झंवर (वय ३२, रा. साई बंगला, सुहास काॅलनी, जळगाव) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी ॲड. प्रवीण पंडीत चव्हाण (रा. सुमंगल अपार्टमेंट, मोदीबाग, शिवाजीनगर), शेखर मधुकर सोनाळकर (रा. नयनतारा अपार्टमेंट, जळगाव), उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पुणे : जिल्हा नियोजन समितीवर भाजप, शिंदे गटाचे वर्चस्व; पदाधिकारी, माजी आमदारांचे पुनर्वसन

जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सोसायटीच्या संचालकांच्या विरोधात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ठेवीदारांचे पैसे परत न केल्याने मालमत्तेची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले होते. अवसायकाने ई-लिलाव प्रक्रिया राबविली होती. तक्रारदार सूरज झंवर यांच्या वडिलांनी तीन मिळकती ई-लिलाव प्रक्रियेत खरेदी केल्या होत्या. डेक्कन पोलीस ठाण्यात माझे वडील सुनील झंवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजकीय हेतूने प्रेरित होऊन माझ्या वडिलांना गुन्ह्यात अडकवले होते, असे झंवर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा जळगाव पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. चव्हाण यांच्या विरुद्ध एक कोटी २२ लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा सोमवारी दाखल झाला होता. या गुन्ह्यातील सर्व घटना या जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे, डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो तपासासाठी जळगाव पोलिसांकडे सोपविला आहे.

हेही वाचा – पुणे : ३० कोटींच्या कर्ज मंजुरीच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणूक, मुंबईतील एकाच्या विरोधात गुन्हा


‘बीएचआर’ प्रकरणात १९ आरोपींवर दोषारोप पत्र

डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ‘बीएचआर’ गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १९ आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात चार पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील १९ आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. चार आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. या खटल्यात सरकारने नवीन विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special public prosecutor praveen chavan investigation of extortion case given to jalgaon police pune print news rbk 25 ssb