PM Modi Pune Visit Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४१ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज पुण्यात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी समस्त पुणेकरांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी पुणे आणि काशी यांच्यातील एक साम्यही आपल्या भाषणात स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आपल्या देशात काशी आणि पुण्याला विशेष ओळख आहे. पुणे आणि काशीत विद्वत्ता चिरंजीव आहे. येथे विद्वत्तेला अमरत्व प्राप्त झाले आहे. पुणे नगरी विद्वत्तेची दुसरी ओळख आहे. अशा भूमित सन्मानित होणं यापेक्षा गर्वाची दुसरी गोष्ट नाही.”
हेही वाचा >> “पंतप्रधान मोदींना मिळालेला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा देशासाठी…”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
“कोणताही पुरस्कार मिळतो तेव्हा आपली जबाबदारीही वाढते. या पुरस्कारासाठी टिळकांचं नाव जोडलं असेल तर दायित्व कित्येक पटीने वाढतं. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मी देशातील १४० देशवासियांच्या चरणी समर्पित करतो. मी देशवासियांना विश्वास देतो की त्यांच्या सेवेत त्यांची आशा, अपेक्षांच्या पूर्तीसाठी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही, असं आश्वासनही मोदींनी दिलं.
पुरस्काराची रक्कम नमामी गंगे योजनेला
“ज्यांच्या नावात गंगाधर आहे त्यांच्या नावाने मिळणाऱ्या या पुरस्कारासह मिळणारी रक्कम मी गंगेला समर्पित करत आहे. मी पुरस्कार नमामी गंगे परियोजनासाठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे”, असंही मोदी म्हणाले.
टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याची दिशा बदलली होती
“भारताच्या स्वातंत्र्यात लोकमान्य टिळकांच्या भूमिकेला, त्यांच्या योगदानाला शब्दांत मांडता येणार नाही. टिळकांच्या काळात आणि त्यानंतर जे स्वातंत्र्य संग्रमातील घटना घडल्या, जे क्रांतिकारी नेते झाले, त्या प्रत्येकावर टिळकांची छाप होती. त्यामुळे इंग्रजांनीही टिळकांना फादर ऑफ इंडियन इंग्रज म्हणावं लागलं होतं. टिळकांना भारताच्या स्वंतत्र्य आंदोलनाची दिशा बदलली होती. इंग्रज म्हणत होते की भारतवासी देश चालवण्याच्या लायक नाहीत, तेव्हा लोकमान्य टिळकांनी सांगितलं की स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भारताची आस्था, संस्कृती, मान्यता मागास असल्याचे प्रतिक आहेत. परंतु, लोकमान्यांनी ते चुकीचं सिद्ध करून दाखवलं. त्यामुळे भारताच्या जनमानसाने टिळकांना लोकमान्यता दिली तसंच, लोकमान्यचा किताबही दिला.