पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) रस्त्यावरील पुणे वनविभागाच्या वन्यप्राणी उपचार केंद्रात पक्ष्यांसाठी आणि विशेषकरून मोठ्या आकाराच्या पक्ष्यांसाठी एक विशेष कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली. या कक्षाच्या उभारणीसाठी पुण्यातील श्रुती जावडेकर आणि सर्वेश जावडेकर या दाम्पत्याने मदतीचा हात पुढे केला असून त्यासाठी ५० लाख रुपयांची देणगी या वन्यप्राणी उपचार केंद्राचे व्यवस्थापन पाहणाऱ्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टला दिली आहे.
सर्वेश जावडेकर हे बांधकाम व्यवसायाशी संबंधित असून श्रुती या वास्तुविशारद आहेत. या कक्षाविषयी माहिती देताना रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या नेहा पंचमिया म्हणाल्या, ‘२०२४ मध्ये पुण्यातील या वन्यप्राणी उपचार केंद्रात सुमारे साडेसात हजार प्राण्यांवर उपचार करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यापैकी जवळपास ४४०० ही पक्ष्यांची संख्या होती. वेगाने सुरु अससेल्या नागरीकरणामुळे आणि बदलत्या हवामानामुळे नजीकच्या भविष्यात उपचारासाठी येणाऱ्या जखमी पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे पक्ष्यांसाठीचा हा विशेष कक्ष वन्यजीव उपचार केंद्राची याबाबतीतली क्षमता वाढवण्यासाठी महत्वाचे ठरेल. सध्या या वन्यप्राणी उपचार केंद्राची क्षमता ही एकावेळी साधरणतः शंभर पक्ष्यांसाठीची आहे. या नवीन कक्षाची ही क्षमता उपचारासाठी तीनशे पक्षी एका वेळी सांभाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.’
सर्वेश जावडेकर म्हणाले, ‘एका अंदाजानुसार भारतात सापडणाऱ्या एकून पक्ष्यांच्या प्रजातींपैकी सुमारे ६० टक्क्यांहून अधिक प्रजाती या दुर्मीळ होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाच्या परिसंस्थेत पक्ष्यांना मोठे स्थान आहे. त्यामुळे पुणे वन विभागाच्या वन्यप्राणी उपचार केंद्रात उभारल्या जाणाऱ्या कक्षाच्या निर्मितीला हातभार लावावा असे वाटल्याने रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टला आर्थिक मदत करत आहोत .”
असा असेल विशेष कक्ष
– पक्ष्यांसाठीच्या या विशेष कक्षामध्ये ३२ युनिट्सची सोय असेल.
– पक्षांच्या प्रकारानुसार एका वेळी १५० ते २०० पक्ष्यांना सामावून घेण्याची क्षमता असेल.
– नवजात पक्षांसाठी उपयुक्त अशा दोन एव्हीयन नर्सरी निर्माण केल्या जातील.
– उपचारानंतर पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याआधी त्यांची उडण्याची क्षमता तपासून पाहण्यासाठी गरजेचा असलेल्या ‘फ्लाईट टेस्टिंग एरीया’ हा या कक्षाच्या रचनेतील एक महत्त्वाचा भाग असेल. – कक्षाच्या उभारणीचे काम येत्या ६ ते ८ महिन्यात पूर्ण करण्यावर भर असेल.