मुंबई महानगर प्रदेश, पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आता विशेष फेरीद्वारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यासाठी पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, २५ ते २७ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येतील, तर ३० ऑगस्टला गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय प्रवेश जाहीर करण्यात येतील.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी ही माहिती दिली. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या राबवण्यात आल्या. त्यानंतर आता विशेष फेरीचा टप्पा सुरू करण्यात येत आहे. विशेष फेरीत केंद्रीय प्रवेश प्रवेशसह राखीव जागांवरील (कोटा) प्रवेशही सुरू राहतील. विशेष फेरीमध्ये विद्यार्थ्यांचे पसंतीक्रम आणि गुणवत्ता यांच्या आधारे प्रवेश होतील. या फेरीमध्ये आरक्षणाच्या रिक्त राहिलेल्या जागा सर्वांसाठी खुल्या होऊन त्या जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातील.
हेही वाचा : राज ठाकरेंच्या हस्ते उद्या पुण्यात ‘मनसे’च्या सभासद नोंदणीला प्रारंभ
विशेष फेरीपूर्वी विद्यार्थ्यांचे पर्याय आणि पसंती अर्ज (भाग दोन) अनलॉक करण्यात येतील. विशेष फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना पसंती अर्ज पुन्हा भरून लॉक करणे आवश्यक आहे. विद्यार्थी संमती नोंदवल्याशिवाय या फेरीत सहभागी होता येणार नाही. तसेच कोटा प्रवेशासाठीही नव्याने पसंती नोंदवणे गरजेचे आहे. या पूर्वीच्या फेरीतील प्रतिबंधित विद्यार्थ्यांना विशेष फेरीत सहभागी होता येईल.
जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार २५ ते २७ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येतील, तर ३० ऑगस्टला गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय प्रवेश जाहीर करण्यात येतील. तर प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत कागदपत्रे अपलोड करणे, कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे आदी प्रक्रिया पूर्ण करता येईल.
हेही वाचा : पुणे : श्वसनाच्या आजारांबाबत जनजागृतीसाठी केईएम रुग्णालयातर्फे लघुपटाची निर्मिती
निकालानंतर प्रवेशाची व्यवस्था
पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर… पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, एटीकेटी सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठीची व्यवस्था करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.