अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीवर महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी विद्यार्थी संघटनांकडून दबाव आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे समितीच्या एका सदस्याने रविवारी सांगितले.  अकरावीला कोणत्याही गैरमार्गाने महाविद्यालयांमध्ये प्रवेश होऊ नयेत म्हणून केंद्रीय प्रवेश समितीने शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची तपासणी करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
अकरावीला हव्या त्या महाविद्यालयामध्ये केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून प्रवेश करण्यासाठी महाविद्यालयांचे प्राचार्य आणि अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्यांवर विविध संघटनांकडून दबाव येत आहे. यामध्ये शहरातील विद्यार्थी संघटना आघाडीवर आहेत. ‘‘केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालय दिलेले असतानाही, हव्या असलेल्या महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांला प्रवेश मिळावा यासाठी संघटनांचे लोक येऊन अरेरावी करतात. विद्यार्थ्यांनी दिेलेले प्राधान्यक्रम आणि त्याला मिळालेले गुण यांची सांगड घालूनच विद्यार्थ्यांना महाविद्यालय दिले जाते. मात्र, कमी गुण असतानाही विशिष्ट महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळावा, यासाठी संघटनांचे सदस्य समितीच्या सदस्यांवर दबाव आणत आहेत,’’ असे समितीच्या एका सदस्याने सांगितले.
महाविद्यालयामध्ये संघटनांच्या दबावाला बळी पडून अतिरिक्त किंवा निवड यादीच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नयेत, यासाठी केंद्रीय प्रवेश समितीने २२ सदस्यांच्या एका पथकाची नेमणूक केली आहे. हे पथक शहरातील सर्व नामांकित महाविद्यालयामध्ये जाऊन त्यांचे प्रवेश तपासणार आहे. ज्या महाविद्यालयाला विद्यार्थ्यांकडून जास्त मागणी आहे, महाविद्यालयाच्या प्राचार्यावर प्रवेशासाठी दबाव येण्याची शक्यता आहे, अशा महाविद्यालयांच्या प्रवेशाची पाहणी करण्यात येणार आहे. महाविद्यालयांना ५ टक्के प्रवेश व्यवस्थापन कोटय़ातून भरण्याची मुभा आहे. मात्र, उरलेल्या ९५ टक्के जागांवर निवड यादीच्या बाहेर एकही प्रवेश होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. पहिली प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर या पथकाने महाविद्यालयांची पाहणी करण्यास सुरूवात केली आहे, अशी माहिती अकारावी केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्यांनी दिली.

Story img Loader