पुणे :महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी खास यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे. याबाबत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण आरोग्य यंत्रणेची खास पथके तैनात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी दिले.संत श्री तुकाराम महाराज संस्थान आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे आदेश दिले.
ते म्हणाले, की यंदा दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी सोहळा होत आहे. त्यामुळे पालखीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यात गृहीत धरून औषधे, पथके तैनात ठेवावीत.संबंधित सर्व विभागांनी संपूर्ण तयारी गतीने करावी. यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागाने एल-निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी- चिंचवड, नगरपरिषदा तसेच सर्व स्थानिक यंत्रणांनी पाणीपुरवठ्याबाबत दक्ष रहावे. पालखी जूनमध्ये निघणार असल्याने उष्णतेचा घटकही लक्षात घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा >>>पुणे: कारखान्यांकडून २४४ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती; साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा
पाणीपुरवठ्याचे टँकर आणि फिरत्या शौचालयांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ करण्यात येईल. आवश्यक निर्जंतुकीकरणाची औषधे, दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तत्काळ काढून टाकण्यात यावीत असे आदेश या वेळी देण्यात आले.
दरम्यान, यंदा आळंदी आणि देहू संस्थानने फिरत्या स्वच्छतागृहांच्या संख्येत वाढ करावी, पालखी प्रस्थानावेळी दोन्ही मंदिरात पासधारक व्यक्तींनाच प्रवेश असावा, दिवे घाटात केवळ चारच बैलजोड्यांना परवानगी द्यावी, पालखी देहू आणि आळंदी निघताना आणि पंढरपुरहून माघारी येताना महसूल अधिकाऱ्यासमवेत पोलीस प्रशासनाचा एक अधिकारी असावा, अशी विनंती प्रशासनाला या बैठकीत केली.