लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त रेल्वे विभागाच्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) ‘भारत गौरव’ या विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील भाविकांसाठी १५ जानेवारी रोजी पुणे स्थानकावरून रात्री दहा वाजता ही विशेष रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना होणार आहे.

केंद्र शासनाच्या ‘देखो अपना देश’ या योजनेंतर्गत ‘भारत गौरव’ ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली असल्याचे ‘आयआरसीटीसी’ पुणे विभागाचे व्यवस्थापक सुभाष नायर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी पुणे रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक गुरुराज सोन्ना उपस्थित होते.

आणखी वाचा-पिंपरी : तळेगाव एमआयडीसीमधून तीन बांगलादेशींना अटक

नायर म्हणाले, ‘आयआरसीटीसीच्या या सेवेद्वारे देशभरातून वर्षभरात आतापर्यंत ८६ रेल्वे गाड्या विविध मार्गांवरून धावल्या आहेत. विशेषत: धार्मिक सोहळ्याच्या अनुषंगाने या गाड्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अनेकांना देशातील पर्यटनाबरोबर महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचे दर्शन घेता आले आहे. नववर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे कुंभमेळा पर्व सुरू होत आहे. त्या निमित्त पुणे, तसेच इतर जिल्ह्यांतील, ग्रामीण भागातील प्रवाशांच्या दृष्टीने विशेष रेल्वे गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवारी (१५ जानेवारी) पुणे स्थानकावरून रात्री दहा वाजता ही विशेष रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना होणार आहे. पुणे, वाराणसी, प्रयागराज, अयोध्या आणि पुन्हा पुणे असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रवाशांचा सात रात्र, आठ दिवसांचा प्रवास असून, या गाडीला ७ शयनयान डबे, वातानुकुलित डब्यांमध्ये (३ एसी, १ सेमी एसी), जेवण बनविण्यासाठी विशेष डबा, असे नियोजन आहे.’

आणखी वाचा-वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात चंदन चोरी, तीन झाडे कापून नेल्याचे उघड

‘या गाडीमध्ये प्रवाशांना सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, जेवण व्यवस्था आदी सुविधांसह प्रवासी वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्या या ठिकाणी उतरल्यानंतर राहण्यासाठीची विशेष सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी डब्यांच्या आरक्षणानुसार प्रवासी शुल्क आकारले जाणार आहे,’ असे नायर यांनी सांगितले.

‘उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी पुणे, तसेच सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात. विशेषत: ग्रामीण भागातील भाविकांना तेथील जास्त माहिती नसते किंवा अडचणी येतात. त्या अनुषंगाने ‘आयआरसीटीसी’कडून कुंभमेळ्याची पर्वणी साधण्यासाठी या विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे,’ असे ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special train from pune for kumbh mela pune print news vvp 08 mrj