पुणे : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे जाहीर केले आहे. या गाड्या पुणे ते मिरजदरम्यान धावणार आहेत.
पुणे विभागाकडून पुणे ते मिरजदरम्यान १२ अतिरिक्त अनारक्षित डेमू आषाढी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्या पुणे-मिरज-पुणे अशा धावतील. विशेष गाडी १५ ते २० जुलै या कालावधीत पुण्याहून दररोज सकाळी ८.३० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी ४.१५ वाजता मिरजला पोहोचेल. विशेष गाडी १५ ते २० जुलै या कालावधीत मिरजहून दररोज दुपारी ४.४५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता पुण्यात पोहोचेल.
हेही वाचा…पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काऊंटडाऊन सुरू! केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले…
या विशेष गाडीला हडपसर, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सालग्रे आणि आरग हे थांबे असणार आहेत. ही विशेष गाडी १० डब्यांची असेल. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
हेही वाचा…पुणे : सारसबागेत नमाज पठण करणाऱ्या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ-खंडवा दरम्यान ब्लॉक
भुसावळ विभागात भुसावळ-खंडवा मार्गावर गेज बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी या मार्गावर विशेष ब्लॉक १३ ते २० जुलैदरम्यान घेण्यात येणार आहे. यामुळे २१ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात १३ जुलैला बिकानेर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, मुजफ्फरपुर-पुणे एक्स्प्रेस, १४ जुलैला साईनगर शिर्डी-बिकानेर एक्स्प्रेस, जबलपूर-पुणे एक्सप्रेस, कालका-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, १५ जुलैला पुणे-जबलपुर एक्स्प्रेस, पुणे-मुजफ्फरपुर एक्स्प्रेस, १६ जुलैला साईनगर शिर्डी-कालका एक्स्प्रेस, १८ जुलैला कालका-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, २० जुलैला साईनगर शिर्डी-कालका एक्सप्रेस, रानी कमलापति-पुणे एक्सप्रेस, बिकानेर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, २१ जुलैला पुणे- राणी कमलापति एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-बिकानेर एक्सप्रेस, जबलपुर-पुणे एक्स्प्रेस, कालका-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-बिकानेर एक्स्प्रेस, २२ जुलैला पुणे-जबलपुर एक्स्प्रेस जेसीओ, पुणे-मुजफ्फरपुर एक्सप्रेस, २३ जुलैला साईनगर शिरडी-कालका एक्सप्रेस मुजफ्फरपुर पुणे एक्सप्रेस या गाड्या रद्द राहतील.