पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शिरूर लोकसभा मतदारसंघात पार्थ सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून पार्थ निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू झाली असून पार्थ यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत हडपसर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी बैठका घेतल्याने ते शिरूरमधून निवडणूक लढविणार, या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधात उमेदवार कोण असेल, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेचे ठरले आहेत. यातील मावळ मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार असून शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे अजित पवार गटात जाणार का, याबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अजित पवार यांनी कोल्हे यांना निवडणुकीत पाडण्याचे जाहीर आव्हान दिले होते. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे पर्यायी आणि सक्षम उमेदवार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही आमचाच उमेदवार निवडून आणणार, असे पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर कोल्हे यांनीही मैदान मारण्याची भाषा केली होती. अजित पवार यांनी जाहीर आव्हान दिल्यानंतर शिरूरमधून अजित पवार गटाचा कोण उमेदवार असणार, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पवार गटात प्रवेश करणार का, या चर्चांनी जोर धरला होता. मात्र अजित पवार यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र पार्थही शिरूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांना शिरूरमधून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : अजित पवारांची भविष्यवाणी खरी ठरणार का ?
अजित पवार यांनी शिरूर लोकसभेकडे विशेष लक्ष दिले असून त्याअंतर्गत येत असलेल्या मतदारसंघात बैठका आणि दौरे सुरू केले आहेत. पार्थ पवार यांनीही हडपसर भागातील राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी मंगळवारी हडपसर विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. या भागातील अजित पवार समर्थक माजी नगरसेवकांशी त्यांनी चर्चा केली. काही नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यालयालाही त्यांनी भेट दिली. त्यामुळे ते शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.