पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांच्या वेगाला आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित कॅमेऱ्यांद्वारे आवर घातला जाणार आहे. इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या संगणक प्रणालीअंंतर्गत महामार्गावर ५२ कॅमेरे लावण्यात आले असून, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना आता दोन ते चार हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांचा वेग आणि निष्काळजीपणा अशा अनेक कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या ऑगस्ट २०२२ मध्य़े झालेल्या अपघाती निधनानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गावर ‘आयटीएमएस’ प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वाहतूक नियंत्रण व्यवस्थापन यंत्रणेचे (हायवेज ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम – एचटीएमएस) काम हाती घेण्यात आले होते. दोन वर्षांच्या कालावधीनंतर ही यंत्रणा कार्यान्वित करून ‘आरटीओ’कडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ‘आरटीओ’च्या चाचणीनंतर तातडीने या प्रणालीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. आता महामार्गाच्या दोन्ही बाजूूंना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याद्वारे बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा…रेल्वेच्या परिसरात पुरुषांचे लज्जास्पद वर्तन…महापालिकेकडे कोणी केली तक्रार?
सीटबेल्ट न लावणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, वेगमर्यादेचे उल्लंंघन केल्यास वाहनचालकांना ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाईचा संदेश मोबाइल क्रमांकावर पाठविला जाणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
…तर पोलिसांंकडून कारवाई महामार्गावर ३०० मीटर उंच अंतरावर हे कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनाचा वेग, चालकाच्या हालचाली स्पष्ट दिसतात. यामध्ये स्वयंचलित क्रमांक वाचणारे तंत्रज्ञान (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर – एएनपीआर) आहे. त्यामुळे वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन मार्गक्रमण करीत असल्यास संबंधित वाहनचालकाने वाहन नोंदणी करताना ‘आरटीओ’त जो मोबाइल क्रमांक दिला आहे, त्या क्रमांकावर दंडात्मक कारवाईचा संदेश जातो. एखाद्या व्यक्तीचा क्रमांक बदलला असेल, वाहनावर क्रमांकाची पाटी नसेल, तर नोंदणी क्रमांकाच्या कोडवरून याबाबतची माहिती मिळवून पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा…शनिवारची सुट्टी वाहतूक कोंडीत… कोठे घडला प्रकार?
अशी असणार वेगमर्यादा
रस्त्याचा प्रकार – खासगी मोटार – व्यावसायिक मोटार आणि अवजड वाहने
घाट रस्ता – प्रतितास ६० किमी – प्रतितास ४० किमी
उतार रस्ता – प्रतितास ८० किमी – प्रतितास ६० किमी
सरळ रस्ता – प्रतितास १०० किमी – प्रतितास ८० किमी