सरकारी पातळीवरील कामे ऑनलाइन होत असताना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) उलटा प्रवास सुरू आहे. सगळी यंत्रणा ऑनलाइन असतानाही वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र स्मार्टकार्ड मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार आरटीओमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. स्मार्टकार्ड तर दूरच, साधी माहितीही नागरिकांनी दिली जात नसल्याचे चित्र सध्या आहे. आरटीओने अर्जावरून ‘स्पीडपोस्ट बारकोड’ गायब केल्याने हा सर्व प्रकार सुरू आहे.

हेही वाचा >>> पुणे : सलग सुट्ट्यांमुळे फळभाजी, पालेभाजीच्या मागणीत घट; बहुतांश फळभाजी आणि पालेभाजीचे दर स्थिर

आरटीओमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. ही संख्या कमी करण्यासाठी जास्तीतजास्त सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. परंतु, या ऑनलाइन सेवा केवळ नावापुरत्याच असल्याचे वारंवार समोर येत आहेत. अनेक वेळा आरटीओतील इंटरनेट ठप्प असल्यामुळे कामे खोळंबतात. सारथीद्वारे वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र स्मार्टकार्ड कोणत्या पातळीवर आहे, याची माहिती मिळण्याची सुविधा पुरवली आहे. यासाठी अर्जात स्पीडपोस्ट बारकोड दिलेला असतो. त्याद्वारे आरटीओतून कार्ड केव्हा बाहेर पडले, ते पोस्टाच्या कोणत्या कार्यालयात आहे याची माहिती मिळते.

हेही वाचा >>> पुणे : उन्हाळ्यामुळे रसाळ फळांना मागणी

आता अर्जावरील स्पीडपोस्ट बारकोड गायब झाला आहे. त्यामुळे आपले स्मार्टकार्ड कुठपर्यंत पोहोचले, हेच नागरिकांना तपासता येत नाही. आधी या कोडमुळे नेमके स्मार्टकार्ड कुठे आहे, याची माहिती नागरिकांना घरबसल्या मिळत होती. आता कोड नसल्यामुळे नागरिकांना नजीकचे टपाल कार्यालय, मुख्य टपाल कार्यालय आणि आरटीओ अशा फेऱ्या माराव्या लागत आहेत. तेथूनही त्यांना योग्य माहिती मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. अर्जावरील बारकोडवरून अर्जदाराला आपला स्मार्टकार्ड कुठे आहे, हे शोधता येत होते. वाहन नोंदणी प्रमाणपत्र व वाहन परवाना स्मार्टकार्ड अर्ज केल्यानंतर १५ दिवसांत घरपोच मिळायला हवे. आता यासाठी दोन-तीन महिने लागत आहेत. स्मार्टकार्डची चौकशी करण्यासाठी लोक टपाल कार्यालये आणि आरटीओच्या चकरा मारत आहेत, असे महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेचे कार्याध्यक्ष विजयकुमार दुग्गल यांनी सांगितले.