पुणे : नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना भरधाव दुचाकीने धडक दिल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर रविवारी सकाळी घडली. दुचाकीच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्यांसह, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी झाले. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलीस कर्मचारी संकेत गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के, मोटारचालक चेतन सिंग, दुचाकीवरील सहप्रवासी सायली टिंगे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मनोहर भाऊ ओंबासे (वय ३९, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार कार्तिक ढवळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल
हेही वाचा – दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता; सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील मांजरी परिसरात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी सकाळी पाचच्या सुमारास नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती. पोलिसांनी तेथे लोखंडी कठडे उभे केले होते. त्यावेळी लोणी काळभोर टोलनाका परिसरातून भरधाव वेगाने दुचाकीस्वार कार्तिक ढवळे निघाला होता. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो लोखंडी कठड्यांवर आदळला. नाकाबंदी करणारे पोलीस कर्मचारी संकेत गांगुर्डे, बारटक्के, तसेच मोटारीतून उतरुन तपासणीसाठी थांबलेले मोटारचालक चेतन सिंग यांना धडक दिली. दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी सायली टिंगे पडल्याने तिला दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता दुचाकीस्वार कार्तिक ढवळे पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक राेकडे तपास करत आहेत.