पुणे : हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या ‘पुणे मेट्रो लाईन ३’ म्हणजेच ‘पुणेरी मेट्रो’ प्रकल्पाचे एकूण काम वेगाने पुढे सरकत आहे. या मार्गावरील मेट्रोसाठीच्या ६०० खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. गणेशखिंड रस्त्यावर या मेट्रोचा ६२२ वा खांब उभा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सव्वा वर्षाच्या कालावधीत हा टप्पा गाठण्यात आला आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणेरी मेट्रोचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर टाटा समूहाने हाती घेतले. त्यांच्या कार्यान्वनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. गणेशखिंड रस्त्यावर एप्रिल २०२२ मध्ये मेट्रोच्या पहिल्या खांबाची उभारणी करण्यात आली. त्यानंतर १५ महिन्यांत ६० टक्के म्हणजेच ६०० खांब उभारणीचा टप्पा ओलांडण्याची कामगिरी करण्यात आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या उभारणीमुळे सुलभ, वेगवान व स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

याबाबत ‘पुणे मेट्रो लाईन ३’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर म्हणाले की, मेट्रोचा सगळा डोलारा उभा राहणार त्या खांबांची उभारणी हा या कामातील सर्वाधिक महत्वाचा टप्पा मानला जातो. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर ‘पुणेरी मेट्रो’साठी एकूण ९२२ खांबांची उभारणी करण्याचे नियोजन आहे. तत्कालीन पीएमआरडीए आयुक्तांच्या हस्ते १३ एप्रिल २०२२ रोजी पहिल्या खांबाचा प्रारंभ झाल्यानंतर केवळ सव्वा वर्षात आम्ही ६२२ खांब उभे करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रोच्या खांबांची उभारणी हा या कामातील सर्वाधिक महत्वाचा टप्पा मानला जातो. दोन हजार मिमी व्यासाचा घाट असणारे हे गोलाकार खांब मेट्रो रेल्वे यंत्रणेच्या आरेखन मापदंडांशी पूर्णपणे सुसंगत असे साकारण्यात येत आहेत, असे पुणे मेट्रो लाईन तीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी सांगितले.