पुणे : विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांच्याबाबत असलेल्या आक्षेपांची पडताळणी करणाऱ्या सत्यशोधन समितीने संस्थेला भेट दिल्यानंतरच्या २४ तासांतच डॉ. अजित रानडे यांना गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून हटवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकेच नाही, तर संस्थेचे कुलपती डॉ. बिबेक देबरॉय यांनी दोन दिवसांतच प्रभारी कुलगुरूंचीही नियुक्ती केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुलगुरूपदासाठी आवश्यक पात्रता नाही, अनावश्यक पदनिर्मिती करून आर्थिक अनियमितता केली, असे आरोप करून डॉ. रानडे यांना विरोध करण्यात आला होता. त्याबाबतच्या तक्रारी गोखले संस्थेचे तत्कालीन कुलपती डॉ. राजीव कुमार, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) करण्यात आल्या होत्या. डॉ. राजीव कुमार यांनी डॉ. रानडे यांना त्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्यानंतर संस्थेच्या कुलपतीपदी डॉ. बिबेक देबरॉय यांची नियुक्ती झाली. त्यांनी सत्यशोधन समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित, टाटा समाजविज्ञान संस्थेचे प्रा. अनिल सुतार, नागपूर-एम्सचे डॉ. सिद्धार्थ दुभाषी यांचा समावेश होता. या समितीने गोखले संस्थेला शुक्रवारी भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी शिफारशी केल्या. समितीच्या भेटीनंतर लगेचच २४ तासांतच शनिवारी (१४ सप्टेंबर) कुलपतींनी डॉ. रानडे यांना हटवण्याबाबतचे पत्र दिले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थतज्ज्ञ म्हणून विख्यात असलेले डॉ. रानडे यांच्याबाबतच्या या कार्यवाहीवर शिक्षण, संशोधनाच्या क्षेत्रातून टीका करण्यात येत आहे.

हेही वाचा : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत तातडीने मिळणार वैद्यकीय उपचार! आरोग्य विभागाचा उपक्रम जाणून घ्या…

डॉ. रानडे यांना हटविल्यानंतर डॉ. देबराॅय यांनी तातडीने प्रभारी कुलगुरूंचीही नियुक्ती केली आहे. यूजीसीच्या नियमानुसार विद्यापीठात प्र-कुलगुरू उपलब्ध नसल्यास कुलपती सर्वांत ज्येष्ठ प्राध्यापकाची कुलगुरू म्हणून नियुक्ती करतील, नवीन कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत ते कुलगुरूच्या जबाबदाऱ्या निभावतील अशी तरतूद आहे. त्याप्रमाणे प्रा. दीपक शाह यांना विनंती केली असता, त्यांनी नकार दिला. त्यामुळे टाटा समाजविज्ञान संस्थेचे प्र-कुलगुरू प्रा. शंकर दास यांची २२ सप्टेंबरपासून प्रभारी कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. दास यांना अंतरिम कुलगुरूपदाची जबाबदारी स्वीकारण्यात कोणतीही अडचण येणार नाही, याबाबत व्यवस्थापन मंडळासह सर्व संबंधितांनी योग्य ती कार्यवाही करण्याचेही निर्देश डॉ. देबराॅय यांनी दिले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speedy process to remove dr ajit ranade from gokhale institute pune print news ccp 14 css