मराठी शुद्धलेखन मार्गदर्शन.. हस्ताक्षर प्रशिक्षण.. अमराठी विद्यार्थी आणि पालकांसाठी मराठीचे सुलभ वाचन.. कथाकथन.. अभिवाचन.. साहित्य संस्थेला भेट.. अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या आयोजनाने शुक्रवारपासून सुरू होणारा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा होणार आहे. त्यामुळे आता शहरातील शाळांमध्ये १५ दिवस ‘म म मराठी’चा असेच चित्र दिसणार आहे.
मराठी या आपल्या मातृभाषेची गोडी विद्यार्थ्यांमध्ये वाढविण्याच्या उद्देशातून राज्य सरकारतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो. यापूर्वी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ ते १५ मे या कालावधीत हा पंधरवडा साजरा केला जात होता. मात्र, या कालखंडामध्ये राज्यातील सर्वच शाळांना उन्हाळ्याची सुटी लागल्यामुळे या पंधरवडय़ाचा केंद्रिबदू असलेला विद्यार्थी हा घरीच असायचा. हे ध्यानात घेऊन भाषा संचालनालयाने यंदाच्या वर्षीपासून १ ते १५ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करावा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता शाळांमध्ये मराठीचा जयघोष करीतच नववर्षांचे स्वागत होणार आहे.
विद्यार्थ्यांची क्षमता आणि भाषा अभ्यासाची आवश्यकता ध्यानात घेऊन सुलभ शिक्षण मंडळाच्या श्री गोपाळ हायस्कूलने मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ातील वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. प्रसिद्ध लेखक प्रा. मिलिंद जोशी आणि राज्य मंडळाचे सहायक सचिव अनिल गुंजाळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पंधरवडय़ाचे उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी (२ जानेवारी) डॉ. विद्यागौरी टिळक या शुद्धलेखनासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांची मुलाखत, ‘मराठी भाषेचा गोडवा’ या विषयावर डॉ. न. म. जोशी आणि ‘मराठी हस्तलिखितातून भाषा समृद्धी’ या विषयावर वा. ल. मंजूळ यांचे व्याख्यान होणार आहे. हस्ताक्षर प्रशिक्षण, पुस्तक परीक्षण, अमराठी विद्यार्थी आणि पालकांसाठी मराठीचे सुलभ वाचन, कथाकथन, कवयित्री आश्लेषा महाजन यांचे कवितावाचन, अभिवाचन, निबंध-पत्र-बोली भाषा- सारांश लेखन या विषयांवर मार्गदर्शन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेस भेट देण्याचा कार्यक्रमही यामध्ये समाविष्ट आहे. पुस्तक दिंडी काढून १५ जानेवारी रोजी पंधरवडय़ाचा समारोप होणार असल्याचे प्राचार्या कल्पना शिंदे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा